छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगाथेला समर्पित 'भारत गौरव पर्यटन ट्रेन'चा ऐतिहासिक शुभारंभ आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत पार पडला. सकाळी 6 वाजून 36 मिनिटांनी या विशेष ट्रेनने 700 हून अधिक प्रवाशांनी आपल्या ऐतिहासिक यात्रेला प्रारंभ केला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रेरणादायी प्रवासाची औपचारिक सुरुवात केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने भारत गौरव यात्रा विशेष ट्रेन सुरू करण्यात आली आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडित असलेल्या अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहे. या उपक्रमातून केवळ पर्यटन नव्हे, तर महाराजांचा स्वराज्यलढा आणि स्वातंत्र्याचा इतिहास नव्या पिढीपुढे जिवंत करण्याचे कार्य होणार आहे."
या सहा दिवसांच्या विशेष यात्रेचा प्रवासक्रमही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठिकाणांनी भरलेला आहे. पहिल्या दिवशी मुंबईहून माणगावमार्गे प्रवासी रायगड किल्ल्यावर पोहोचतील. रायगडवर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत असून, त्याच पार्श्वभूमीवर या ट्रेनच्या शुभारंभाचे विशेष औचित्य आहे.
दुसऱ्या दिवशी पुण्यातील लाल महाल, ऐतिहासिक कसबा गणपती आणि शिवचरित्र साकार करणाऱ्या 'शिवसृष्टी' या स्थळांना भेट दिली जाणार आहे. तिसऱ्या दिवशी प्रवासी शिवनेरी किल्ला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि भीमाशंकर या प्राचीन ज्योतिर्लिंगस्थळाला भेट देतील. चौथ्या दिवशी सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्यावर महाराजांच्या रणसंग्रामाचा इतिहास अनुभवता येईल.
पाचव्या दिवशी यात्रेकरूंना कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी मंदिर आणि ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्याला भेट देता येईल. सहाव्या आणि अंतिम दिवशी ट्रेन पुन्हा मुंबईत परत येईल.
ही यात्रा फक्त ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यापुरती मर्यादित नसून, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला श्रद्धांजली अर्पण करणारी आहे. त्यामुळे या यात्रेचा अनुभव प्रवाशांसाठी एक आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीने भरलेला असणार आहे.
या विशेष उपक्रमासाठी रेल्वे विभाग व आयआरसीटीसीकडून प्रवाशांच्या निवास, भोजन, वाहतूक व सुरक्षेची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील प्रवासी यामध्ये सहभागी झाले असून, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचा या यात्रेत उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व प्रवाशांना सुरक्षित, प्रेरणादायी आणि संस्मरणीय यात्रेच्या शुभेच्छा दिल्या. हा उपक्रम महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सांस्कृतिक जागृतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा