Pune Crime News : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; दोघांवर हल्ला, चौघांना अटक
(Pune) पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत पाहायला मिळते आहे. शिवाजीनगर न्यायालयाजवळील तोफखाना परिसरात एका टोळक्याने दोन तरुणांवर कोयत्याने हल्ला करून खूनाचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
समीर शेख (वय ४८, रा. शिवाजीनगर) यांनी या घटनेची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यांचा मुलगा आयान आणि पुतण्या फिरोज यांच्यावर टोळक्याने हल्ला केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आदित्य बडसकर (२२), रोहन शिंदे (२३), अथर्व कदम (२४), आणि प्रथम मोहिते (२१) अशी आहेत. हे सर्वजण शिवाजीनगर गावठाणातील बहिरट आळीतील रहिवासी आहेत. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधी झालेल्या वादाच्या रागाने आरोपी कोयते व इतर हत्यारे घेऊन आपल्या साथीदारांसह मध्यरात्री तोफखाना भागात आले. त्यांनी आयान आणि फिरोजवर सपासप वार करत गंभीर जखमी केलं. हल्ल्यानंतर परिसरातील वाहनांची तोडफोड करत त्यांनी दहशत पसरवली, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेचच कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस करत आहेत.
हेही वाचा