राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्रिभाषा धोरण, मनसे-शिवसेना आघाडी आणि जय गुजरात वादावर भाष्य करत अनेक मुद्द्यांवर रोखठोक मत व्यक्त केलं. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "आजपर्यंत दूरपर्यंत अन्याय झालेला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्रिभाषा समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने पाचवीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना म्हटलं होतं की, जर पहिल्यापासून इंग्रजी शिकवली गेली, तर मुलांना भविष्यात त्याचा उपयोग होईल. पण, मराठी माणसाने इंग्रजी शिकणं हा अभिमान समजला जातो आणि हिंदी शिकणं हा अवमान कसा काय?", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मनसे आणि शिवसेनेच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले की, "मराठीचा मुद्दा घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येत असतील, तर काँग्रेसचा पाठिंबा त्यांना मिळेल, असं वाटत नाही. काँग्रेसच्या विचारसरणीशी हे जुळत नाही."
काल पुण्यातील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी "जय गुजरात" म्हटल्यावर वाद निर्माण झाला होता. यावर मुनगंटीवार म्हणाले की, "राष्ट्रगीत गाताना आपण 'भारत माता की जय' म्हणतो, त्यामध्ये गुजरातसह संपूर्ण भारत येतोच. मग यातून गैरसमज निर्माण करून वातावरण गोंधळात टाकण्याचे प्रयत्न का करताय?", तसंच "दिल्लीचे तक्त राखतो, महाराष्ट्र माझा," असं म्हणत मुनगंटीवार यांनी राज्यातील अस्मितेचा पुनरुच्चार केला. शेवटी ते म्हणाले की, "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र यावं, पक्ष विलीन करावा आणि त्यांना आमच्याकडून शुभेच्छा!"
हेही वाचा