बीड जिल्ह्यातील गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संशयित नर्तिका पूजा गायकवाडला पोलिस कोठडीनंतर आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे येणारा संपूर्ण नवरात्र उत्सव तिला तुरुंगातच काढावा लागणार आहे.
लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी नर्तिका पूजा गायकवाडसोबत असलेल्या प्रेमसंबंधातील तणावातून गोळी झाडून आत्महत्या केली होती. पूजाच्या घरासमोरच उभ्या केलेल्या कारमध्ये त्यांनी जीवन संपवलं. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ माजली होती.
घटनेनंतर गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर गायकवाडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिला अटक झाली. सुरुवातीला तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. मात्र आज बार्शी न्यायालयाने युक्तिवाद ऐकून तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला.
कला केंद्रात झालेल्या पहिल्या भेटीतून गोविंद आणि पूजाची मैत्री झाली आणि ती नंतर प्रेमसंबंधात रुपांतरित झाली. गोविंद विवाहित असून एक मुलाचा बाप असल्याचं माहिती असूनही त्यांचं नातं चालू होतं. गोविंदने तिला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या. त्याने गेवराई येथे उभारलेल्या आलिशान बंगल्यावरही पूजाने हक्क सांगितला होता.
गोविंद आपल्या कुटुंबासोबत राहत असलेल्या या बंगल्याचं नाव आपल्यावर करावं, असा पूजाचा आग्रह होता. मात्र गोविंदला ते मान्य नव्हतं. या कारणावरून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. अखेर पूजाने त्याच्याशी बोलणं थांबवलं आणि धमक्याही दिल्या. मानसिक ताण वाढल्यानंतर गोविंदने आत्महत्येचा मार्ग निवडला.
न्यायालयीन कोठडीमुळे पूजाची चौकशी आता तुरुंगातूनच केली जाणार आहे. त्यामुळे नवरात्राचा संपूर्ण काळ तिला तुरुंगात काढावा लागणार आहे. पुढील सुनावणीदरम्यान तिच्या जामिनावर निर्णय होईल. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीला अधिक गती दिली आहे.