मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं. संजय राऊत यांना उद्देशून देशपांडे यांनी जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "गल्लीतून दिल्लीपर्यंत प्रश्न विचारणार, यांनी आम्हाला सल्ले देऊ नये. आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे आणि नाही विचारायचे ते... ताटातल्या चमच्यांनी चमच्याचं काम करावं...त्यांनी बाहेर येऊन आम्हाला घास भरवण्याचा प्रयत्न करू नये. आत्तापर्यंत शिवसेना गटाची मनसेबरोबर युती करायचंय, असं एकदाही पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले नाहीत हे मी स्पष्ट करतो. त्यामुळे कोणी यावर बोलण्याचा विषयच येत नाही. जे चमचे आहेत, आजूबाजूचे तेच दररोज दिंडोरा पेटवत आहेत. सकारात्मक असल्याचं भासवत आहेत. परंतु पक्षप्रमुखांची इच्छा आहे की नाही, हे अद्यापही आम्हाला समजलेलं नाही. त्यामुळे त्यावर बोलायचा विषयच येत नाही."
शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर टीका करत देशपांडे म्हणाले की, "उद्धव ठाकरे असे म्हणाले की शिवसैनिकांच्या मनात जे आहे किंवा राज्याच्या मनात जे आहे तेच होईल. तर मग उद्धव ठाकरे यांना शिवसैनिकांच्या मनातलं किंवा राज्यांतल्या लोकांच्या मनातलं कळतं का, हाच माझा प्रश्न आहे. जर कळत असेल तर जेव्हा महाबळेश्वर येथे अधिवेशन झालं तेव्हा सर्व शिवसैनिकांच्या मनात होतं की राज ठाकरे कार्याध्यक्ष झाले पाहिजेत, पण ते झाले नाही जे शिवसैनिकांच्या मनात होतं."
देशपांडेंच्या या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनीसुद्धा पत्रकार परिषद घेतली. त्यांनी म्हटले की, "संदीप देशपांडे हे नेहमीच पक्षाच्या भूमिका मांडत असतात. त्यांनी त्याचप्रमाणे आजही त्यांचं मत व्यक्त केलं. पक्षप्रमुख त्याची दखल घेतली. मी वारंवार सांगत असतो की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊच निर्णय घेतील. आज जे बोलत आहेत ते राजकारणामध्ये खूप उशिरा आलेले आहेत. मी ठाकरे कुटुंबाला किंवा ठाकरे बंधूंना खूप वर्षांपासून जवळून पाहतोय, ओळखतोय. म्हणून मला माहीत आहे काय होणार आहे, काय होणार नाहीये ते...ते माझ्या इतकं कोणालाच माहिती नाहीये. मूळात संदीप देशपांडे काय बोलतात त्यांच्या म्हणण्याला इथे काहीच अर्थ नाही. फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच म्हणण्याला अर्थ आहे. आज कोणी काहीही म्हणेल, असं एकेकाळी महाविकास आघाडी पण बनणार नाही असं म्हणणारे होते. पण तरीही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे सरकार बनलंच ना, मुख्यमंत्री झाले, तीन वर्ष सरकार उत्तम पद्धतीने सांभाळलं."
राऊत पुढे म्हणाले की, "राजकारणामध्ये माणसाने कायम आशावादी आणि संयमी राहिल पाहिजे. काही लोकांना आता त्यांच्या प्रशिक्षणाची गरज आहे. नुसता उखळपणा करून राजकारणात कुठेही चालत नाही. खूप संयम ठेवावा लागतो, विशेषतः जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो, मराठी माणसाच्या न्यायहक्काचा प्रश्न असतो, तेव्हा संयम आणि त्याग या दोन गोष्टी असल्याशिवाय महाराष्ट्राचं नेतृत्व आपण करू शकत नाही."
त्यांनी इतिहासाचाही दाखला देत सांगितले की, "संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा विचार केला तर या लढ्यामध्ये भिन्न विचारांचे लोक एकत्र आले. मग कम्युनिस्ट पक्ष सगळे एकत्र आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, समाजवादी पक्ष सगळे एकत्र आले. हे विचाराने वेगळे होते, त्यांची भूमिका वेगळी होती, पण हे सर्व मुंबईसह महाराष्ट्र एकत्र मिळवण्यासाठी एकत्र आले. हा इतिहास राजकारणात आहे. याचा अभ्यास सगळ्यांनी करणे गरजेचे आहे."
हेही वाचा