देशातील सर्वात आधुनिक सीसीटीव्ही प्रणालीचे उद्घाटन आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने सुसज्ज असलेली ही प्रणाली गुन्हे शोधणे आणि नियंत्रणात ठेवणे या बाबतीत शहरासाठी क्रांतिकारी ठरणार आहे. मात्र, उद्घाटन प्रसंगी फडणवीस यांनी केलेल्या मिश्किल टोलेबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतली.
कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी म्हटले की, “दादा आमच्या सोबत आहेत, तिजोरी आपल्याकडे आहे. आम्हालाही त्या ठिकाणी निधी लागेल, पण दादा आमच्या सोबत आहेत, आमची तिजोरी आमच्या सोबत आहे, त्यामुळे काही अडचण नाही. आपल्या दानशूर लोकदेखील आमच्या सोबत आहेत.” या विनोदी विधानाने उपस्थितांमध्ये हास्याची लाट पसरली.
पुढे सीसीटीव्ही प्रणालीची वैशिष्ट्ये सांगताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "ही नवी प्रणाली केवळ कॅमेऱ्यांद्वारे प्रतिमा टिपणारी नाही, तर त्याच ठिकाणी ‘सिच्युएशन ॲनालिसिस’ आणि ‘क्राइम सीन ॲनालिसिस’ करण्याची क्षमता असलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने गुन्हा झाल्यानंतर काही मिनिटांत हजारो कॅमेऱ्यांचे फुटेज विश्लेषण करून गुन्हेगाराचा माग काढता येणार आहे. एखादा गुन्हा करून आरोपी पसार झाला, तरी काही मिनिटांत त्याला शोधणे आता शक्य होईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.