राज्यात पावसाने जोर वाढवला आहे. काही ठिकाणी नद्या, नाल्यांना पूर आला आहे. खडकवासला धरणसाखळीत मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुण्याच्याल डेक्कन येथील बाबा भिडे पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पुल पाण्याखाली जातोय.
खडकवासला धरणातून 18 हजार क्युसेक वेगाने पाणी मुठा नदीत सोडण्यात आलंय. त्यामुळे मुठा नदी पात्र दुथडी भरून वाहतंय. यानंतर पाण्याचा वेग वाढवून २६ हजार क्युसेकने पाणी सोडलं जाईल. दरम्यान मध्यरात्री पुण्यातील एस.एम.जोशी पुलाखाली नदीपात्रात थरार पाहायला मिळाला. कारसह पुरात वाहून जाणाऱ्या चौघांचा जीव वाचवण्यात अग्निशमन दल आणि डेक्कन पोलिसांनी वाचवले.
रात्री पावणे दोनच्या सुमारास एस.एम. जोशी पुलाखालील नदी पात्रालगतच्या रस्त्यावरून कुणाल लालवाणी हे कुटुंबियांसमवेत चारचाकी वाहनातून जात होते. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी पाण्याच्या प्रवाहात वाहू लागली. या घटनेची माहिती अग्निशामक विभागाच्या नियंत्रण कक्षाला देताच, अग्निशामक विभागाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांची सुटका केली.