भारत व इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आज, 2 जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबेस्टन मैदानावर सुरू झाला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असून भारतीय संघ फलंदाजी करत आहे. पहिल्या कसोटीत पराभव पत्करलेला भारत मालिकेत बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात आहे.
पहिल्या सत्रात टीम इंडियाने 25 षटकांत 2 बाद 98 धावा केल्या. डावाची सुरुवात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी केली. मात्र, केएल राहुल लवकर बाद झाला. त्याने 25 चेंडूत 2 धावा केल्या. ख्रिस वोक्सने टाकलेल्या चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. करुण नायरने दुसऱ्या कसोटीत संयमी खेळी करत 50 चेंडूत 31 धावा केल्या. परंतु ब्रायडन कार्सच्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. दुसरीकडे, यशस्वी जैस्वालने जबरदस्त फलंदाजी करत अर्धशतक साजरं केलं आहे. त्याने 61 चेंडूंमध्ये 11 चौकार मारत 59 धावा केल्या असून तो अजूनही नाबाद आहे.
भारतीय संघात काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी आकाशदीपचा समावेश झाला आहे. तसेच नितीश कुमार रेड्डी व वॉशिंग्टन सुंदर यांनाही संधी देण्यात आली आहे. साई सुदर्शन आणि शार्दुल ठाकूरला संघाबाहेर बसावं लागलं आहे. एजबेस्टनवर पहिले गोलंदाजी करणाऱ्या संघाचा यशाचा इतिहास पाहता, इंग्लंडचा निर्णय निर्णायक ठरू शकतो. आता पाहावे लागेल की भारत पहिल्या डावात किती धावा उभारतो आणि सामन्याचे पारडे कोणाच्या बाजूने झुकते.
भारताची प्लेइंग इलेव्हन:
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन:
बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर