नवी दिल्ली : देशात सध्या सुरू असलेल्या मंदिर-मशीद (Mosque) वादाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत देशातील शंभर वर्षांहून अधिक जुन्या आणि प्रमुख मशिदींचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court of India) करण्यात आली आहे. ग्यानवापी मशिदीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही याचिका महत्वाची मानली जातेय.
शंभर वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या प्रमुख मशिदींतील तलाव आणि विहिरींमधून वजू खाने हलवण्याचे निर्देशही देण्याचीही मागणी जनहित याचिकेता केली आहे. वजू ही एक इस्लामिक प्रक्रिया आहे जी मशिदींमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शरीराचे अवयव स्वच्छ करण्यासाठी केली जाते.
याचिकेनुसार अशा मशिदींचे गोपनीय सर्वेक्षण केल्यानंतर तिथे काही अवशेष आढळल्यास अनावश्यक जातीय तणाव आणि धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार टाळता येतील, असे जनहित याचिकेत म्हटले आहे. ही जनहित याचिका अधिवक्ता शुभम अवस्थी यांच्या वतीने अधिवक्ता विवेक नारायण शर्मा यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, गोपनीय सर्वेक्षण करून अहवाल सादर होईपर्यंत विवादित मालमत्ता कोणत्याही पक्षाकडून किंवा त्यांच्या हस्तक्षेपापासून मुक्त ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करण्याची मागणी सप्त ऋषी मिश्रा यांनी केली आहे. न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये प्रतिवादींना 100 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या आणि महाभारत, रामायण, पुराण, वेद आणि उपनिषदांमधील अस्तित्वामुळे वादात असलेल्या सर्व प्राचीन आणि प्रमुख मशिदींचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.