गाझा युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेल्या शांतता आराखड्याला हमासकडून अंशतः मान्यता देण्यात आली आहे. संघटनेने ओलीसांची सुटका आणि गाझा प्रशासन एका स्वतंत्र पॅलेस्टिनी संस्थेकडे सोपवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, निशस्त्रीकरण (Disarmament) आणि काही इतर अटींवर अधिक चर्चा आवश्यक असल्याचे हमासने स्पष्ट केले आहे.
हमासने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही अरब, इस्लामी आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचे स्वागत करतो, ज्यात अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रयत्नांचाही समावेश आहे. गाझातील युद्ध समाप्त करून कैद्यांची अदलाबदल आणि मानवी मदतीचा प्रवेश मिळवून देण्यासाठी हे प्रयत्न महत्त्वाचे आहेत.” हमासने पुढे सांगितले की, ट्रम्प यांच्या प्रस्तावानुसार सर्व कैद्यांची जिवंत असो वा मृत अवशेष सुटका करण्यास ते तयार आहे, परंतु यासाठी आवश्यक भौगोलिक आणि सुरक्षा परिस्थिती सुनिश्चित करणे गरजेचे आहे.
संघटनेने हेही जाहीर केले की, तात्काळ मध्यस्थांच्या माध्यमातून सविस्तर चर्चा सुरू करण्यास तयार आहे. तसेच गाझा पट्टीचे प्रशासन एका स्वतंत्र पॅलेस्टिनी संस्थेला किंवा तज्ञांच्या समितीला सोपवले जाईल, ज्याला अरब आणि इस्लामी देशांचा पाठिंबा असेल. या पावलाला संघर्ष समाप्ती आणि स्थैर्याकडे जाणारे महत्त्वाचे संकेत मानले जात आहेत.
ट्रम्प यांच्या शांतता योजनेत तात्काळ युद्धविराम (Ceasefire), हमासकडील ओलीसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायली तुरुंगांतील पॅलेस्टिनी कैद्यांची अदलाबदल, गाझामधून टप्प्याटप्प्याने इस्रायली सैन्याची माघार, हमासचे निशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली तात्पुरते सरकार स्थापनेचा प्रस्ताव आहे. ही योजना सध्या इस्रायल, सौदी अरेबिया आणि अनेक युरोपीय देशांनी पाठिंबा दिलेली आहे.
व्हाईट हाऊसकडून हमासच्या या प्रतिसादावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तथापि, अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते, ही हालचाल मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्याच्या दिशेने एक सकारात्मक संकेत ठरू शकते. इस्रायल मात्र हमासच्या निशस्त्रीकरणावर ठाम असून, त्याशिवाय कोणतीही राजकीय प्रक्रिया स्वीकारली जाणार नाही, अशी भूमिका कायम ठेवत आहे.
हमासची ही तयारी गाझातील मानवतावादी संकट कमी करण्यासाठी एक आशेचा किरण म्हणून पाहिली जात आहे. दीर्घकाळ चाललेल्या संघर्षामुळे हजारो लोक विस्थापित झाले आहेत आणि आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. आता जर ही शांतता योजना पुढे सरकली, तर ती फक्त गाझाच नव्हे, तर संपूर्ण मध्यपूर्वेत शांतता आणि स्थैर्यासाठी ऐतिहासिक टप्पा ठरू शकते.