वाशिम जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे. पावसाचा कहर वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष बाब म्हणजे २४ तास उलटून गेले तरी प्रशासनाचा एकही अधिकारी अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी शेतात साचलेल्या पाण्यात उतरून आंदोलन केले आहे.
विदर्भात सोयाबीन म्हणजे पिवळे सोनं समजलं जातं. मात्र जोरदार पावसामुळे वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कारण शेतात पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिंपरीमधील शेतातील पेरणी केलेली पिकेसुद्धा वाहून गेली आहेत. सोयाबीन पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मात्र असे असतानाही प्रशासनाचा एकही अधिकारी शेतकऱ्यांकडे आला नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतात साचलेल्या पाण्यात उतरून आंदोलन केले आहे. तूर आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानामध्ये पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रशासनाने लवकरात लवकर येऊन पंचनामे करून जास्तीत जास्त मदत जाहीर करावी, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना प्रशासनाकडून जर मदत जाहीर झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा आणि वेळप्रसंगी आत्महत्या करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
हेही वाचा