पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत जोरदार पाऊस बरसला. अवघ्या एका तासाच्या आत शहरातील अनेक भाग जलमय झाले. पवळे पूल, चिखली, ताथवडे, पुनावळे, यमुनानगर, बिजलीनगर, भोसरी, आकुर्डी आणि चिंचवड बीआरटी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. चिखलीतील घरकुल भागात घरांत पाणी शिरले. तर भोसरीत एका कारवर झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
जोरदार वार्यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी वाहने पाण्यात वाहून गेली. पुण्याजवळील दिवे घाट परिसरात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊन रस्ते नाल्यांसारखे झाले होते. पावसामुळे माती, दगड आणि गोटे रस्त्यावर आले होते. त्यामुळे घाटमाथ्यावरील वाहतूक विस्कळीत झाली.
दरम्यान, पुण्यातील महत्त्वाच्या शासकीय इमारतींपैकी असलेल्या आयबी गेस्ट हाऊसमध्येही पाणी शिरले. जिन्यांपर्यंत पाणी पोहोचल्याने आमदार, माजी आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवास व्यवस्थेला अडथळा निर्माण झाला. गेस्ट हाऊसचे कर्मचारी पाणी बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. शहरात तिसऱ्या दिवशीही संध्याकाळी पावसाचा जोर कायम राहिला. आज, 14 जून रोजीसुद्धा हवामान खात्याने पुणे व परिसरात ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा