प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आजपासून अमरावतीच्या मोझरी येथे आंदोलन सुरू केले असून अन्नत्याग आंदोलन ते करणार आहेत. शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलन करण्यापूर्वी अमरावतीत भव्य बाईक रॅली काढण्यात आली आहे. अमरावती ते मोझरी अशी ही बाईक रॅली बच्चू कडू आणि इतर कार्यकर्त्यांकडून काढण्यात आली. यावेळी बच्चू कडू म्हणाले की, "आम्ही वारंवार आंदोलन करत आलो आहोत. यापूर्वी रायगडला आंदोलन केलं. त्यानंतर रक्तदान आंदोलन केलं आणि आता अन्नत्याग करून पुन्हा आंदोलन करत आहोत. सरकार हे बोललं होतं त्यांनी ते पूर्ण करावं. दिलेल्या आश्वासनातील प्रत्येक गोष्टीची त्यांनी पूर्तता करावी. जस कर्जमाफी, एमएसपी २० टक्के अनुदान, दिव्यांगांना ६ हजार मानधन, पेरणी ते कापणी सर्व काम एमआर रिजन्समधून कट व्हावी, मेंढपाळ, दुध उत्पादक शेतकरी आणि आमचा मच्छिमार यांच्यासाठी एक धोरण आखावे. हे विषय घेऊन आम्ही आजपासून आंदोलनाला सुरूवात करत आहोत."
जीव गेला तरी मागे हटणार नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली होती. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, "आम्ही हे चौथं आंदोलन करत आहोत. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली पण त्याची काही भार कार्यवाही झाली नाही. त्यांनी होकार दिला पण नंतर ते थांबलेले दिसत आहेत. त्यामुळे हे अखेरच आंदोलन म्हणून अन्नत्याग आम्ही करत आहोत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार. आंदोलन स्थळावरून अंतयात्रा निघाली तरी बेहत्तर, पण आम्ही आंदोलन थांबवणार नाही", असा निर्धार बच्चू कडू यांनी केला.
हेही वाचा