चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात एका महिलेनं अनैतिक संबंधातून आपल्या पतीच्या मृत्यूचा कट रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रंजना रामटेके या 50 वर्षीय महिलेने मुकेश त्रिवेदी नावाच्या तिच्या प्रियकराच्या मदतीने श्याम रामटेके या 65 वर्षीय पतीची हत्या केली. ही घटना 6 ऑगस्ट 2022 रोजी घडली असून एका कॉल रेकॉर्डिंगमुळे तीन महिन्यांनंतर या हत्येचा खुलासा झाला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
श्याम रामटेके यांचा 6 ऑगस्ट 2022 रोजी मृत्यू झाला होता. हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे रंजना यांनी त्यावेळी सांगितले. हा निरोप त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना दिला. त्यामुळे सर्वांना तो नैसर्गिक मृत्यू वाटला. रामटेके यांच्या मुली नागपूरला असतात. बातमी मिळताच त्या ब्रम्हपुरीला परत आल्या. वडिलांच्या निधनानंतर आई घरी एकटीच राहत असल्याने लहान मुलगी आईसोबत राहू लागली. दरम्यान, तिला आईच्या वागण्यात काही बदल जाणवले. रंजना रामटेकेचे आंबेडकर चौकात छोटे जनरल स्टोअर आहे. मुकेश त्रिवेदी याचे भाजीपाला आणि बांगड्यांचे दुकान तिच्या दुकानाजवळच आहे. याच ठिकाणी दोघांचे प्रेमसंबंध जुळले.
मुकेश त्रिवेदी हा वारंवार रामटेके यांच्या घरी येत असे. त्याचे हे वागणे मुलीला खटकले. तिने आई आणि मुकेश त्रिवेदी या दोघांनाही समज दिली. मुलीने आईला आपला स्मार्टफोनही वापरण्याकरता दिला. दरम्यान, मुलीला त्या दोघांमधील काही कॉल रेकॉर्ड्स सापडले. ते तिला संशयास्पद वाटले. ते कॉल रेकॉर्डिंग्स 6 ऑगस्ट रोजी पहाटेचे होते. साधारण दहा मिनिटांचे एक ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकून मुलीला धक्का बसला. या रेकॉर्डिंगमध्ये मुकेश त्रिवेदीच्या मदतीने रंजनाने पतीला मारण्याचा कट रचला असल्याचे उघड झाले. तिने जेवणात गुंगीच्या गोळ्या टाकल्या. त्यानंतर झोपेतच त्यांचे हातपाय बांधले आणि तोंडावर उशी दाबून खून केला, अशी माहिती समोर आली.
रेकॉर्डिंग हाती लागल्यावर मुलीने आई आणि तिच्या प्रियकराविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रंजना रामटेके आणि मुकेश त्रिवेदी यांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
हेही वाचा