छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या धाडसी दरोड्याप्रकरणी तपास अधिक खोलात जात असून, सोमवारी (23 जून) पोलिसांनी या प्रकरणातील 20 वा आरोपी अटक केला. अंबाजोगाई येथून अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव राजेश श्रीकृष्ण साठे (वय 30, रा. भट गल्ली, अंबाजोगाई) असे आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साठे हा मुख्य आरोपी सुरेश गंगणेचा जवळचा मित्र असून, दरोड्यानंतर गंगणे याने आपल्या वाट्याला आलेले सोने साठेच्या हवाली विक्रीसाठी दिले होते. या घडामोडींमुळे साठे पोलिसांच्या रडारवर आला होता.
राजेश साठे यास सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. जाधव यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 26 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. साठे याच्या वतीने अॅड. प्रकाश उंटवाल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
दरोड्याच्या योजनांमध्ये सक्रिय सहभाग
पोलीस तपासात समोर आले आहे की, साठे हा दरोड्यानंतर मुख्य सहा आरोपी ज्या-ज्या ठिकाणी फिरले, त्या सर्व ठिकाणी त्यांच्यासोबत होता. त्याला उर्वरित चोरीस गेलेल्या सोन्याबाबत ठोस माहिती असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शिवाय, गंगणे आणि इतर आरोपींबरोबर साठे याच्या मोबाईलवर काही संशयास्पद चॅटिंग झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या चॅटिंगच्या आधारे सोन्याचा मागोवा घेता येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पूर्वीही गुन्हेगारी पार्श्वभूमी
विशेष म्हणजे, राजेश साठे याच्यावर 2016 साली अंबाजोगाईत बलात्काराचा गुन्हा नोंद असून, त्याचा गुन्हेगारी इतिहास तपास यंत्रणांसाठी नवा धागा ठरू शकतो.
या अटकेनंतर लड्डा दरोडा प्रकरणातील एकूण अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 20 वर पोहोचली आहे. पोलिसांनी अजून काही संशयितांवर नजर ठेवली असून, तपास अधिक व्यापकपणे सुरू आहे.
हेही वाचा