राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) नुकतेच NEET UG 2025 चे निकाल जाहीर केले. यंदाच्या वर्षी देशभरातून तब्बल 22 लाख 9 हजार 318 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी 12 लाख 36 हजार 531 उमेदवारांनी पात्रता मिळवली आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे पुण्यातील महावीर स्कूलचा विद्यार्थी कृष्णांग जोशी याने NEET UG 2025 मध्ये 681 गुण मिळवत ऑल इंडिया रँक 3 मिळवली आहे. त्याच्या यशामागे सातत्य, अभ्यासाची शिस्तबद्ध पद्धत आणि मानसिक स्थैर्य हे महत्त्वाचे घटक ठरले.
मूळचा उत्तराखंडचा असलेल्या कृष्णांगने NEET ची तयारी दहावीतच सुरू केली. पुण्यातील एका खासगी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्याला स्पर्धा परीक्षांचा परिचय झाला. दहावीतच ANTHE परीक्षेत यश मिळवून त्याने 100 टक्के शिष्यवृत्ती मिळवली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या एका संस्थेतून NEET ची तयारी त्याने केली. दररोजच्या अभ्यासाच्या वेळापत्रकासोबतच त्याने NCERT च्या अभ्यासक्रमाची रिव्हिजन अनेकदा केली आणि नियमितपणे मॉक टेस्ट्स सोडवून आत्मपरीक्षण करत राहिला.
भौतिकशास्त्र त्याचा आवडता विषय होता. तो सांगतो, “भौतिकशास्त्र समजून घेतल्यावर लक्षात राहतं. पाठांतर नको, फक्त संकल्पना समजून घेऊन सराव करावा लागतो.” त्याचा हाच दृष्टिकोन त्याच्या यशाचे मुख्य सूत्र ठरले.
तयारीच्या काळात काही अध्याय कंटाळवाणे वाटत असले, तरी कृष्णांगने स्वतःला प्रेरित ठेवण्यासाठी मॉक टेस्ट्समधील रँककडे लक्ष केंद्रित केलं. आई-वडिलांचा आणि मित्रांचा मानसिक आधार त्याने या प्रवासात सतत घेतला. गिटार वाजवणं आणि स्वयंपाक हे त्याचे छंद त्याने काही काळासाठी थांबवले, पण NEET नंतर पुन्हा ते सुरू करणार असल्याचे त्याने सांगितले.
CBSE बोर्डाच्या १२वी परीक्षेत त्याने 94.8 टक्के गुण मिळवले. त्याचे पुढील स्वप्न आहे – AIIMS दिल्लीमध्ये प्रवेश घेऊन सर्जिकल शाखेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणे. “मी हाताने काम करण्यावर अधिक विश्वास ठेवतो. निदानापेक्षा उपचार अधिक महत्त्वाचा वाटतो,” असं तो म्हणतो.
कृष्णांग जोशीची ही यशोगाथा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रेरणा देणारी ठरते – वेळेचे योग्य व्यवस्थापन, संकल्पनात्मक स्पष्टता आणि मानसिक स्थैर्य असलं की कोणतीही कठीण परीक्षा सहज पार करता येते. कृष्णांगचे हे यश NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरेल.
हेही वाचा