जालन्यात परतूर येथे अजित पवार गटाचा कार्यक्रम होता. माजी आमदार सुरेश जेथलीया यांच्या पक्षाप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. सुरेश जेथलीया यांच्यासोबत त्याच्या समर्थकांनीही पक्षामध्ये प्रवेश केला आहे. परतूरमधील जाहीर सभेत प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की "लाडकी बहिण योजना आणली तेव्हा आमच्यावर टीका करण्यात आल्या. आज देखील मीडिया वाले सांगतात 'ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार', हे सर्व राज्य सरकार ठरवेल. तुम्हाला कोणी अधिकार दिलाय. मी अर्थसंकल्प दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार होतो. राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही पावले उचलतोय".
आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पूर्ण करतो....
पुढे अजित पवार म्हणाले की " आज माझ्या लाडक्या बहिणी इथे बसल्या आहेत. मला या सभेच्या निमित्ताने सांगायच आहे की, कालच मी इथं परतूर मठाला येत असताना ३५०० कोटी रुपयांच्या चेकवर सही केली. आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. दिलेला शब्द पाळणारे आहोत. परंतु दिलेल्या योजनेचा फायदा पण तुम्ही नीट केला पाहिजे".
पीक विमा योजनेबद्दल
एक रुपया पीक विमा योजनेबाबत अजित पवार म्हणाले की "एक रुपयांमध्ये पीक विमा योजना आणली... का आणली माझ्या शेतकऱ्याला ती परवडली पाहिजे... परंतु या योजनेमध्ये किती चुकीचे प्रकार घडले आहेत. काहीजण स्वत:ची गाराने गात होती. देवस्थानच्या जमिनी स्वत:च्या दाखवल्या पिकं दाखवली.... अशी चुक करायला लागली, तर कुठं रे फेडाल ही पाप, वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही नियमाने वागा, तुमचा अधिकार आहे. तुमच्यावर अन्याय झाला तर जरुर वाचा फोडण्याचं काम, दाद मागण्याचं काम तुम्ही करा.
पुढे अजित पवार म्हणाले की "घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यामातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे. त्याचा आदर आम्हीही करत आहोत. संविधानाचा आदर तुम्हालाही आहे. त्याच रस्त्याने आम्ही पुढे चालोय. पण कुठेतरी चांगली योजना आणायची. त्या घटकाला त्याचा फायदा होण्याऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यांनी त्यांचा फायदा घेणं हे बरोबर नाही आहे. हे कुठेतरी थाबंल पाहिजे" असं अजित पवार म्हणाले.