राजकारण

या सरकारला जनाची नाही, मनाची...; नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. लोकशाही, संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे. भाजपाच्या या मनमानी कारभाराविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून या लढ्यासाठी जे पक्ष बरोबर येतील त्यांना एकत्र घेऊन लढा दिला जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

कोणाला काय वाटते आणि कोणाच्या मनात काय आहे, हा आमचा प्रश्न नाही, आम्ही काही पक्षांना बरोबर घेऊन लढत आहोत, त्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात पण देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे, देश विकून देश चालवला जात आहे, शेतकरी, तरुणांना बरबाद केले जात आहे, महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त आहे. अशा परिस्थितीत भाजपाच्या विरोधात एकत्रित लढा दिला पाहिजे. आमची भूमिका स्पष्ट आहे, जे पक्ष बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन लोकशाही व संविधान वाचवण्याचा लढा देऊ. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसचे मोलाचे योगदान आहे, स्वातंत्र्यानंतर ६० वर्षात देशाला महासत्ता बनवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून वंचित, मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आणि भाजपा मात्र हे सर्व संपुष्टात आणण्याचे काम करत आहे.

खारघर घटनेवर शिंदे सरकार सत्य लपवत आहे. सरकारकडून मृतांचा आकडाही जाहीर केला जात नाही. हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता सुरु होणार होता पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उशिरा आल्याने तो ११.३० वाजता सुरु झाला. रणरणत्या उन्हात लाखो लोक बसले होते. या कार्यक्रमावर सरकारच्या तिजोरीतून १३.८० कोटी रुपये खर्च करूनही लोकांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती आणि त्याचवेळी नेते व मंत्र्यांसाठी आलीशान वातानुकुलीत व्यासपीठ तयार केले होते. लाखो लोक पाण्यासाठी तडफडत असताना हे मंत्री, संत्री शाही भोजन झोडत होते, त्याचे फोटोही प्रसार माध्यमात प्रसिद्ध झाले आहेत.

खारघरमध्ये कार्यक्रम सुरु असताना पहिला मृत्यू १२ वाजता झाला तरिही कार्यक्रम सुरुच ठेवला. एवढा मोठा प्रकार घडूनही सरकारचे मंत्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच वेळ दिली होती असा आरोप करुन त्यांना दोषी ठरवत आहेत. या सरकारला जनाचा नाही मनाची जर असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही मागणी केली होती पण सरकारने एका आयएएस अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमली आहे, हा केवळ धुळफेक करण्याचा प्रकार असून सरकारमध्ये हिम्मत असेल तर उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधिशांकडून खारघर घटनेची चौकशी केली पाहिजे.

खारघर घटनेने महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावयास लावली परंतु राज्यातील सरकार मात्र त्याकडे फारसे गांभिर्याने पहात नाही. या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून सत्य परिस्थिती काय आहे हे जनतेला कळावे यासाठी प्रदेश काँग्रेसने आज राज्यभर सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषदा घेऊन शिंदे फडणवीस सरकारची पोलखोल केली व खारघर घटनेतील सत्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप