राजकारण

नवीन युग सुरु होतंय? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय? राज ठाकरेंची सूचक पोस्ट

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : ब्रिटिश महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी वृद्धपकाळानं निधन झालं. त्या मागील काही काळापासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराणी क्वीन एलिझाबेथ या 96 वर्षांच्या होत्या. ब्रिटीश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणाऱ्या साम्राज्याच्या साक्षीदार असलेल्या क्वीन एलिझाबेथ सात दशके सर्वाधिक काळ ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर विराजमान होत्या. त्यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशम मीडियाच्या माध्यमातून राणी एलिझाबेथ द्वितीय यांना अभिवादन केले आहे.

काय आहे राज ठाकरे यांची पोस्ट?

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. ७० वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही ७० वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची ७० वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ २ ह्यांच्यामुळे.

ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मार्गारेट थॅचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं.

कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण ७० वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ २ ह्यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ २ ह्यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरु होतंय? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाच असेल. एलिझाबेथ २ ह्यांच्या स्मृतीस अभिवादन, असे राज ठाकरेंनी लिहिले आहे.

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

बारामतीत पैशांचा पाऊस? रोहित पवारांनी केला व्हिडिओ ट्विट

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा! राज्यातील लोकसभेच्या 11 जागांवर आज मतदान

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना