राजकारण

सत्तापक्षाच्या नेत्यांनी तोंडाचा पट्टा सैल सोडून मैला...; शिवसेनेचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजप नेते व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यामध्ये शाईफेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशवनात विधिमंडळ आणि परिसरात शाईचे पेनवर बंदी घालण्यात आले आहे. यावरुन शिवसेनेने सामना संपादकीयमधून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील सरकार आता धसका सरकार बनलं आहे. पेनवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय भेदरटच, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

शाईच्या पेनवर बंदी घालण्याचा हा निर्णय हास्यास्पदच म्हणावा लागेल. लेखणीत वापरली जाणारी शाई म्हणजे जणुकाही एके-47 बंदुका किंवा आरडीएक्ससारखे विस्फोटक आहे, अशी भीती राज्यातील भाजप पुढारी व मिंधे सरकारच्या मनात घर करून बसली आहे. पेन वगैरे तपासणे हा पोरकट प्रकार आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर किंवा कुठल्याही नेत्यावर अशा प्रकारची शाईफेक होणे हे वाईटच. अशा घटनांचे समर्थन कदापि करता येणार नाही. लोकशाही राज्यव्यवस्थेत सरकारने जनतेचा विश्वास संपादन करणे, जनतेला आपलेसे करणे आणि जनतेची मने जिंकणे अपेक्षित असते. पण महाराष्ट्रात तसे होताना दिसते आहे काय, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

आधी तोंडाला येईल ते बरळायचे, जनतेच्या मनातील श्रद्धास्थानांवर आघात करायचा, महापुरुषांची वाटेल तशी बदनामी करायची आणि नंतर धसका घेऊन शाईच्या पेनवर बंदी घालण्याचे भेदरट निर्णय घ्यायचे, यालाच राज्यकारभार म्हणावे काय? शाईवर किंवा पेनवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणारच नाही असा कारभार करायला काय हरकत आहे! बरे, विधिमंडळात शाईच्या पेनवर बंदी घातल्याने काय साध्य होणार आहे? सरकारला जनतेत मिसळावेच लागते. मग शाईच्या पेनवर अशी बंदी कुठे कुठे घालणार? त्यामुळे असे शाईबंदीचे उफराटे निर्णय घेण्यापेक्षा उफराटी विधाने करणाऱ्या पुढाऱ्यांच्या बेलगाम बोलण्यावर खरे तर बंदी घालायला हवी, असे शिवसेनेने म्हंटले आहे.

महाराष्ट्रात वाचाळवीर मंत्री व सत्तापक्षाच्या नेत्यांनी तोंडाचा पट्टा सैल सोडून जो काही मैला गेल्या काही दिवसांत बाहेर फेकला, त्यामुळेच महाराष्ट्राचे वातावरण कलुषित व प्रदूषित झाले हे नाकारता येईल काय? हवाबाण सोडून सामाजिक वातावरण बिघडवण्यात खास करून भाजपचे पुढारी आघाडीवर आहेत व त्यातूनच चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. मात्र त्या घटनेपासून राज्यातील मिंधे सरकार अधिकच बिथरल्यासारखे वागू लागले आहे.

महाराष्ट्रातील सरकार मिंधे तर आहेच; पण आता ते धसका सरकारही बनले आहे. शाईहल्ल्याच्या भीतीने विधिमंडळ आवारात शाईच्या पेनवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय भेदरटच म्हणावा लागेल. शाईवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणार नाही अशी आचरट विधाने मंत्री व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी टाळली तर असे बंदीचे घाबरट निर्णय घेण्याची वेळ धसका सरकारवर येणार नाही, असेही शिवसेनेने म्हंटले आहे.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण