राजकारण

'मराठी माणसांची एकजूट म्हणजे ‘मिंधे’ गटात सामील झालेल्यांची कमअस्सल अवलाद नाही'

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात राजकीय अस्थिरता असतानाही भाजपने निवणुकांसाठी रणशिंग फुंकले आहे. आगामी निवडणुकांलाठी भाजपने मिशन महाराष्ट्र सुरु केले असून त्यांचे विशेष लक्ष मुंबईवर असल्याचे दिसून येते. अशातच सध्या राज्यभर नवरात्रीची धूम असताना भाजपने रास-दांडीयांचे आयोजन केले आहे. यावरुन शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेवर पाठीमागून घातकी वार करणाऱ्यांना याच शिवसेनेने स्वाभिमानाने जगायला शिकविले. गर्वाने ‘मराठी’पणाची कवचकुंडले दिली, पण आज तेच लोक शिवसेनेवर उलटले आहेत, अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे.

मुंबई महापालिकेवरील ‘भगवा झेंडा’ खाली खेचण्यासाठी भाजपच्या कमळाबाई अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या करीत आहे. एका बाजूला मराठी लोकांत फूट पाडायची तर दुसऱ्या बाजूला शाकाहार, मांसाहार असे विषय घेऊन इतर प्रांतीय, समाजाला वेगळे करायचे असे त्यांचे एकंदरीत धोरण आहे. गणपती उत्सवानंतर नवरात्री उत्सवात भाजप आपल्या राजकीय टिपऱ्या अशा प्रकारे घुमवत आहे. अर्थात असे ‘दांडिये’ घुमवून मराठी माणसांची एकजूट फोडता येईल हा त्यांचा भ्रम आहे. मुंबईतील मराठी माणसांची एकजूट म्हणजे ‘मिंधे’ गटात सामील झालेल्या आमदारांची कमअस्सल अवलाद नाही, असा टोलाही शिवसेनेने शिंदे गटाला लगावला आहे.

मुंबईवरील संकटाचा प्रत्येक घाव शिवसेनेने छातीवर झेलला आहे. बॉम्बस्फोटांचे दहशती घाव झेलून शिवसेना भवन हिमतीने उभे आहे. शिवसेनेचा दांडिया अस्सल मर्दानीच असतो. शिवसेनेने सामान्य जनतेचे प्रश्न सोडवले. शिवसेनेच्या शाखा म्हणजे चोवीस तास लोकांसाठी उघडी असलेली जनमंदिरेच आहेत. तितकीच ती न्यायाची मंदिरे आहेत. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या 50 वर्षांत कमळाबाईने हे असले ‘दांडिये’ प्रयोग भरपूर केले, पण त्यांना यश आले नाही. पवित्र उत्सवातही राजकारणाच्या फोडाफोडीचे विष पेरणारे हे लोक महाराष्ट्रावर दुहीची आफत आणत आहेत. दिल्लीश्वरांना मुंबईवरून भगवा हटवायचाच आहे व त्यासाठी त्यांचे हे नवे नवे उद्योग सुरू झाले आहेत, अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे.

आम्ही मराठी म्हणून ते ‘मराठी दांडिया’चा खेळ करत बसले नाहीत, तर हिंदू म्हणून हातात शस्त्र घेऊन क्षत्रिय धर्मास जागले. आज मुंबईचा ताबा घेण्याचे मनसुबे जे रचत आहेत त्यांनी मुंबईसाठी काय केले, याचा हिशोब द्यावा. शिवसेना शिल्लक आहे म्हणून मऱ्हाठी शिल्लक आहे. हिंदुत्व बचावले आहे. भगवा फडकतो आहे. शिवसेनेवर पाठीमागून घातकी वार करणाऱ्यांना याच शिवसेनेने स्वाभिमानाने जगायला शिकविले. गर्वाने ‘मराठी’पणाची कवचकुंडले दिली, पण आज तेच लोक शिवसेनेवर उलटले आहेत. स्वकीयांशी लढणे हे महाराष्ट्राचे व मराठय़ांचे दुर्भाग्य काय आजचे आहे, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका

'प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठिशी' प्रकाश शेंडगे यांची टीका