परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला 21 महिने पूर्ण होऊनही अजूनही आरोपी मोकाट फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले असून, या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, अशी ग्वाही दिल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले.
21 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालय परिसरात महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा, तसेच कराड गँगचे इतर सदस्य सहभागी असल्याचा आरोप आहे. मात्र, आजतागायत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पीडित कुटुंबियांनी वेळोवेळी न्यायासाठी संघर्ष केला.
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीबाबत बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या, "21 महिन्यांपासून सुरू असलेल्या अन्यायाची कहाणी मी मुख्यमंत्र्यांना सांगितली. हे ऐकून ते भावुक झाले. 'कोणताही गुन्हेगार वाचणार नाही', असा शब्द त्यांनी मला दिला. तसेच त्यांनी तात्काळ बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून कारवाईचे आदेश दिले."
या प्रकरणात पोलीस तपास का थांबवला गेला, याबाबतही त्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. "धनंजय मुंडे यांच्या परळी येथील बंगल्यावरून वाल्मिक कराडने पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला आणि तपास थांबवण्यात आला, असे आम्हाला समजले. त्या संदर्भातील सीडीआर काढण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली," असेही त्यांनी सांगितले. "या हत्येत कोण कोण सामील आहे, त्यांची नावेही आम्ही मुख्यमंत्र्यांना दिली आहेत. कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही," असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर आता पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. गेल्या 21 महिन्यांपासून आरोपी मोकाट फिरत असून, आता त्यांच्या अटकेची जबाबदारी या एसआयटीवर आहे.
महादेव मुंडे हत्याप्रकरणात आतापर्यंत अनेक महत्त्वाचे टप्पे पार पडले आहेत. 24 जानेवारी 2025 रोजी पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. 25 जानेवारीला प्रकरण अंबाजोगाईच्या पोलीस उपाधीक्षकांकडे वर्ग करण्यात आले. 11 फेब्रुवारीला ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एसआयटीची मागणी केली होती. 16 जुलै रोजी पोलिस तपासात प्रगती न झाल्याने ज्ञानेश्वरी यांनी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. 29 जुलै रोजी मुख्यमंत्री कार्यालयातून कुटुंबीयांना भेटीसाठी बोलावण्यात आले. 31 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले.
या साऱ्या घडामोडींमुळे महादेव मुंडे हत्येचा तपास आता निर्णायक वळणावर आहे. कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी एसआयटी कितपत प्रभावी ठरते, हे येणारा काळच ठरवेल.
हेही वाचा