बनावट कागदपत्राच्या आधारे अल्प उत्पन्न गटातून सदनिका बाबत गैरप्रकार केल्याने न्यायालयाने राज्याचे कृषिमंत्री मानिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. दरम्यान याप्रकरणी कोकटेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणीदेखील विरोधकांनी केली आहे. यावरुनच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोठा गदारोळ झालेला बघायला मिळाला.
अंबादास दानवे यांनी शोक प्रस्तावाआधी बोलण्याची परवानी मागितली. दानवे म्हणाले, "राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर न्यायालयाने कारवाई केली आहे. पण मी केवळ सरकारकडे खुलासा मागतोय. माझं म्हणणं आहे की एका मंत्र्याला न्यायालयाने शिक्षा दिली आहे. त्या शिक्षेला स्थगिती दिलेली नाही. दोन वर्षे कारावासची शिक्षा सुनावली आहे. तरीदेखील त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. ते मंत्री आज अधिवेशनात सहभागी होत आहेत. यावर सरकारची भूमिका काय आहे ते सरकारने स्पष्ट करावं. शोक प्रस्तावानंतर मला या विषयावर बोलता येणार नाही. त्यामुळे मी तुमची परवानी घेऊन बोलतोय".
यावर सभापती म्हणाले, "हा सध्या कनिष्ठ सभागृहाचा विषय आहे. तुम्हाला दुसऱ्या आयुधामार्फत हा विषय या सभागृहात मांडता येईल". यावर दानवे म्हणाले, "मला व राज्यातील जनतेला केवळ यावर सरकारचं म्हणणं ऐकायचं आहे. कारण भ्रष्टाचार प्रकरणात मंत्र्याचा दोष सिद्ध झाला आहे असं असूनही सरकार यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही".
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केले. ते म्हणाले की, "शोकप्रस्तावाच्या दिवशी गोंधळ घालणं योग्य नाही. तसेच कोकाटे प्रकरणात सुनावणी लांबणीवर गेली आहे. कोकाटे प्रकरणावर कोर्टाचा निर्णय आल्यानंतर राज्यपाल निर्णय घेतील", असे म्हणाले.