बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. येणाऱ्या ऑक्टोबरनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्याआधी प्रभाग रचनेचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने हे वेळापत्रक जाहीर केले आहे. तथापि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात प्रभाग रचना करण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
कोरोना तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा अशा अनेक मुद्द्यांवरुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बराच काळापासून रखडल्या होत्या. मात्र अखेर या निवडणुकांच्या कामाला गती मिळाली. आता राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे मतदान सुरु होण्याची शक्यता आहे. यासाठी निवडणूक आयोगाची तयारी युद्धपातळीवर सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळापत्रकानुसार मुंबई महानगरपालिकेची फायनल प्रभाग रचना 6 ऑक्टोबरनंतर तर ‘ड’ वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना 13 ऑक्टोबरला निश्चित होणार आहे. प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला आधीच 17 जूनपासून सुरुवात झाली असून त्यावर काम चालू आहे. 6 ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असून या काळात प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, जनतेकडून हरकती मागवणे, सुनावण्या घेणे आणि अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणे या प्रक्रिया यामध्ये करण्यात येणार आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून म्हणजेच 2020 पासून या निवडणूका घेण्याचा प्रस्ताव चालू होता. मात्र प्रत्यक्षात या निवडणुका काही ना काही कारणांनी होऊ शकल्या नाहीत. मात्र आता राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, आदींच्या निवडणुका या ऑक्टोबर च्या सुरुवातीपासून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.