देशातील आघाडीची SUV निर्माता कंपनी महिंद्रा आपली प्रसिद्ध बोलेरो गाडी पूर्णपणे नवीन लूक आणि डिझाईनसह लाँच करण्याच्या तयारीत आहे. भारतीय रस्त्यांवर गेली दोन दशके अधिराज्य गाजवणारी बोलेरो आता नव्या अवतारात दाखल होणार आहे. सध्या या गाडीचे टेस्टिंग सुरू असून, सोशल मीडियावर तिचे काही व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या बोलेरोचे डिझाईन पारंपरिक शैलीपेक्षा पूर्णपणे वेगळे असून, यात महिंद्राच्या स्कॉर्पिओ एनसारख्या आधुनिक रचना दिसून येतात. फ्लॅट रूफलाइन आणि बॉक्सी शेप कायम ठेवण्यात आला असला तरी, गाडीच्या कडांना अधिक गोलसर लूक देण्यात आला आहे. यामुळे गाडीला अधिक प्रीमियम आणि शहरी लुक मिळाल्याचे जाणवते.
नवीन बोलेरोमध्ये पूर्णपणे नव्याने डिझाइन केलेला फ्रंट एंड, ट्विन पीक्स लोगो असलेली ग्रिल, गोलाकार प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, फ्लश डोअर हँडल्स आणि मोठे अलॉय व्हील यांसारखे अनेक आधुनिक अपडेट्स मिळणार आहेत. याशिवाय, पुन्हा डिझाइन करण्यात आलेले ओआरव्हीएम, मागील बाजूस व्हर्टिकल एलईडी टेललॅम्प्स आणि साइड-हिंग्ड टेलगेट ही वैशिष्ट्ये देखील दिली जाणार आहेत. स्पेअर व्हीलसाठी टेलगेटवर जागा कायम ठेवली आहे.
महिंद्राचा नवीन NFA प्लॅटफॉर्म 15 ऑगस्ट रोजी सादर होणार असून, याच कार्यक्रमात बोलेरोच्या पुढील पिढीचे मॉडेलही कॉन्सेप्ट म्हणून सादर होण्याची शक्यता आहे. नवीन बोलेरो ग्रामीण तसेच शहरी ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरणार आहे.
हेही वाचा