महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत तब्बल 14 हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ही योजना केवळ महिलांसाठी असूनही, अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याने आता शासनाने तपासणीची प्रक्रिया अधिक काटेकोर करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ज्या अपात्र व्यक्तींनी चुकीने किंवा हेतुपुरस्सर लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाणार आहे.
तटकरे यांनी स्पष्ट केलं की, योजनेअंतर्गत कागदपत्रांची व लाभार्थ्यांची सतत छाननी केली जात आहे. 28 जून 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, आतापर्यंत 2.63 कोटी महिलांनी नोंदणी केली होती. यापैकी 2.47 कोटी महिलांना लाभ दिला जात आहे. म्हणजेच छाननीनंतरच अंतिम लाभार्थ्यांची निवड झाली आहे.
नागपूर जिल्ह्यातच 61 हजारांहून अधिक अपात्र लाभार्थ्यांचे प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला व काही पुरुषांचा समावेश आहे. काही प्रकरणांत पुरुषांनी जाणीवपूर्वक आपल्या खात्यात रक्कम जमा करून घेतली, तर काही ठिकाणी घरातील महिलांचे बँक खाते नसल्याने त्यांच्या ऐवजी पुरुषांचे खाते वापरण्यात आले होते.
योजनेचा गैरवापर करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आल्याचे तटकरे यांनी नमूद केलं. यापुढे अशा प्रकरणांवर अधिक लक्ष देत अपात्र लाभार्थ्यांना हटवून त्यांच्याकडून आर्थिक वसुली केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा