ताज्या बातम्या

Gopichand Padalkar : रायगड किल्ल्यावरील अतिक्रमणाच्या 'त्या' नोटीसा गोपीचंद पडळकरांनी फाडल्या, म्हणाले....

रायगड किल्ल्यावर धनगर समाजातील काही कुटुंबांना पुरातत्त्व विभागाने अतिक्रमणाच्या कारणावरून दिलेल्या नोटिसांच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली.

Published by : Team Lokshahi

रायगड किल्ल्यावर धनगर समाजातील काही कुटुंबांना पुरातत्त्व विभागाने अतिक्रमणाच्या कारणावरून दिलेल्या नोटिसांच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी सांगितले की, "या नोटीसा तात्काळ मागे घेतल्या पाहिजेत. जर तुम्ही पुरातत्त्व खात्याचे अधिकारी असाल, तर शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्यांच्या पश्चातसुद्धा रायगडावरील सेवा धनगर समाजाच्या लोकांनी केली आहे. याची तुम्हाला माहिती असावी."

ते पुढे म्हणाले की, "धनगर समाजाने रायगडावर गेली तीनशे वर्षे निःस्वार्थ सेवा बजावली आहे. महाराजांनी अठरापगड जातींनासोबत घेऊन स्वराज्य उभं केलं आणि त्यामध्ये धनगर समाजाचा मोलाचा वाटा आहे. गडावर येणाऱ्या पर्यटकांना माहिती देण्याचं कामही धनगरबांधवांनी इमानदारीने केलं आहे. इतकंच नाही, तर काही वर्षांपूर्वी रायगडावर खोदकामादरम्यान सापडलेली 17 कोटी रुपये रक्कम या समाजाने प्रामाणिकपणे सरकारकडे जमा केली."

पडळकर यांनी पुरातत्त्व खात्यावर आरोप करत म्हटले की, "जर हे खोडसाळपण कुणाच्या सांगण्यावरून केले असेल, तर अशा नोटीसा मागे घेणे अत्यावश्यक आहे. धनगर समाजाची घरे काही जास्त नाहीत, पण त्यांना हटवणे हा अन्याय आहे."

"या प्रकरणाची जबाबदारी मी घेतो. मीच या कुटुंबांना पक्की घरे व कायमस्वरूपी वीज जोडणी मिळवून देण्याचं काम करणार आहे. दोन दिवसांपूर्वी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा केली असून येत्या दोन दिवसांत रायगडावर जाऊन आमच्या धनगर समाजाच्या बांधवांची भेट घेणार आहे," असे ठाम वक्तव्य त्यांनी केलं.

याचवेळी त्यांनी शेतकरी प्रश्नांवर बोलताना बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेतली आणि सांगितले की, "शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2014 ते 2019 या काळात शेतकऱ्यांसाठी 49 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. दुष्काळी भागासाठी केंद्र सरकारकडून निधी आणण्यात आला होता. वीजबिल माफी, सोलार पंप, विहिर योजना, तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोफत घरे देण्याचे क्रांतिकारी निर्णय देखील याच काळात घेण्यात आले होते."

"सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले असून, बच्चू कडूंनी सरकारवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे," असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका करत पडळकर म्हणाले, "जयंतराव पाटील राजकारणातून पळ काढणारे नेते आहेत. इतकी वर्षे मंत्री असतानाही आपल्या जिल्ह्यासाठी एकही मोठा प्रकल्प आणू शकले नाहीत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं चाक आता पूर्णपणे फुटलेलं आहे. ट्यूब नाही तर टायरच बर्स्ट झालं आहे. त्यामुळे आता ते रणांगणात टिकणार नाहीत."

"छत्रपती शिवाजी महाराज हे अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभं करणारे नेता होते. धनगर समाजाने त्यांच्या निधनानंतर सुद्धा रायगडावरील सेवा अबाधित ठेवली. आज त्याच समाजावर अन्याय होतो आहे, याला मी कदापि सहन करणार नाही," असे ठाम मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी