मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उपनगरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख या ‘मेट्रो 4’, त्याचा विस्तार असलेली ‘मेट्रो 4 अ’ आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी दरम्यानच्या ‘मेट्रो 6’ या मार्गिकांसाठी एकूण 57 मेट्रो गाड्यांची खरेदी करण्यात येणार आहे.
या खरेदीसाठी ‘मेट्रो 4’ आणि ‘मेट्रो 4 अ’ मार्गांसाठी 39 गाड्यांचे कंत्राट लारसन अँड टुब्रो (L&T) कंपनीकडे सोपवले असून, या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 4788 कोटी रुपये इतकी आहे. दुसरीकडे, ‘मेट्रो 6’ मार्गासाठी लागणाऱ्या 18 गाड्यांची जबाबदारी NCC कंपनीकडे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही कंपन्या पहिल्यांदाच मेट्रो कोच निर्मितीत सहभाग घेत आहेत.
या प्रकल्पांची कामे सध्या वेगात सुरू असून, कॅडबरी जंक्शन ते गायमुख या 10.5 किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याची चाचणी ऑगस्ट 2025 मध्ये घेण्याचे नियोजन आहे. हा टप्पा वर्षाअखेरीस प्रवासी सेवेसाठी खुला होईल, असा एमएमआरडीएचा अंदाज आहे. ‘मेट्रो 6’ च्या कामातही गती देण्यात येत असून, लवकरात लवकर सेवा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या खरेदी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, त्यामुळे आवश्यक मेट्रो गाड्यांची उपलब्धता वेळेत होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे उपनगरीय भागातील प्रवास आणखी जलद आणि सुलभ होणार आहे.
यापूर्वी मेट्रो कोच तयार करणाऱ्या कंपनी
मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी विविध कंपन्यांनी वेगवेगळ्या मार्गिकांसाठी मेट्रो कोच तयार केले आहेत. सर्वप्रथम मुंबई मेट्रो लाईन 1 (वर्सोवा – घाटकोपर) साठी दक्षिण कोरियाची कंपनी Hyundai Rotem ने मेट्रो कोच तयार केले. या कोचेस 2010 ते 2013 या कालावधीत तयार होऊन मुंबईत आणण्यात आले. पुढील टप्प्यात, मुंबई मेट्रो लाईन 2A (दहिसर – डीएन नगर) आणि लाईन 7 (दहिसर – अंधेरी ईस्ट) साठी Alstom Transport India या फ्रेंच कंपनीच्या भारतीय शाखेने श्रीपेरंबदूर (तामिळनाडू) येथील युनिटमध्ये हे कोच Make in India मोहिमेअंतर्गत तयार केले. या कोचेससाठी सुमारे 1854 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते.
मुंबई मेट्रो लाईन 3 (कोलाबा – बांद्रा – SEEPZ), जी संपूर्णतः भुयारी आहे. यासाठी BEML Ltd. आणि आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथील Alstom या कंपन्यांनी संयुक्तपणे कोच डिझाइन व निर्मितीचे काम केले आहे. हे कोच अत्याधुनिक, सायलेंट आणि वातानुकूलित असणार आहेत.
हेही वाचा