IND vs ENG, 3rd Test Day 3 : लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस भारतीय संघासाठी अत्यंत संस्मरणीय ठरला. दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले, तर शेवटी मैदानावर निर्माण झालेल्या वादामुळे वातावरणही तापले. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने आपल्या आक्रमक फलंदाजीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंतने इंग्लंडविरुद्ध 36 कसोटी षटकारांसह वेस्ट इंडिजचा दिग्गज विवियन रिचर्ड्सचा विक्रम मोडीत काढत सर्वाधिक षटकार मारणारा कसोटी फलंदाज म्हणून आपली नोंद केली. यासह त्याने भारताकडूनही रोहित शर्माशी बरोबरी करत 88 षटकारांपर्यंत मजल मारली. या यादीत आता फक्त वीरेंद्र सेहवाग (90 षटकार)च पुढे आहे.
SENA देशांमध्ये पंतचा दबदबा अधिकच वाढला आहे. या देशांतील कसोटी मालिकांमध्ये सर्वाधिक धावा करणारा आशियाई यष्टीरक्षक म्हणून त्याने स्वतःचाच विक्रम मोडला असून सध्या त्याच्या नावावर इंग्लंडविरुद्ध 416 धावा आहेत. यापूर्वी 2018 साली ऑस्ट्रेलियात त्याने 350 धावा केल्या होत्या. धोनीच्या 13 अर्धशतकांच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली असून पंतने त्यात 5 शतकेही झळकावली आहेत. दुसऱ्या बाजूला केएल राहुलने आपली फॉर्म कायम राखत लॉर्ड्समध्ये दुसरे कसोटी शतक झळकावले. 2021 नंतर लॉर्ड्सवर हे त्याचे दुसरे शतक ठरले. दिलीप वेंगसरकरनंतर हे दोन शतके करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
खालच्या फळीतील फलंदाज आकाशदीपने देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले. दोन वेळा एल्बीडब्ल्यूच्या निर्णयावर DRS घेत त्याने स्वतःला वाचवले आणि त्यानंतर जोफ्रा आर्चरला षटकार मारून भारताची पिछाडी फक्त तीन धावांवर आणली. दिवसाचा शेवट मात्र चर्चेचा विषय ठरला तो भारतीय कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडच्या झॅक क्रॉलीशी केलेल्या वादामुळे. दिवसाचा शेवटचा षटक जसप्रीत बुमराह टाकत होता. क्रॉलीने खेळ सुरू करण्याआधी वेळकाढूपणा केला. खेळाच्या वेळेची मर्यादा पूर्ण होत चालल्यामुळे बुमराहला आणखी एक षटक टाकता येणार की नाही यावर प्रश्न निर्माण झाला. यामुळे संतापलेल्या शुभमन गिलने टाळ्या वाजवत उपरोधिक प्रतिक्रिया दिली आणि इंग्लिश फलंदाजांवर नाराजी व्यक्त केली. इतर भारतीय खेळाडेही त्यात सहभागी झाले आणि काही क्षण मैदानावर तणावाचे वातावरण निर्माण झाले.
तिसऱ्या दिवसाचा शेवट भारतीय संघाच्या आघाडीच्या स्थितीत झाला असला तरी, शुभमन गिलचा हा वाद आणि पंत-राहुलच्या खेळीमुळे हा दिवस भारतीय क्रिकेटच्या दृष्टिकोनातून संस्मरणीय ठरला.
हेही वाचा...