ताज्या बातम्या

Crime News : शुल्लक वादातून जीवघेणा हल्ला! चाकूनं युवकावर सपासप वार; एकाचा बळी, दोघे जखमी

शहरात किरकोळ कारणावरून घडलेल्या हिंसक घटनेने एकाचा जीव गेला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Published by : Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगर शहरात किरकोळ कारणावरून घडलेल्या हिंसक घटनेने एकाचा जीव गेला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मित्राला शिवीगाळ केल्याच्या रागातून चिकन शॉपमध्ये काम करणाऱ्या युवकाने मांस कापायच्या चाकूने तिघांवर सपासप वार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री 8 वाजता मुकुंदवाडी स्मशानभूमीजवळ घडली. या घटनेत नितीन सोनाजी संकपाळ (35, रा. राजनगर, मुकुंदवाडी) याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा भाऊ सचिन सोनाजी संकपाळ आणि मित्र दत्ता बालाजी जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत.

सचिन काही दिवसांपूर्वी पुण्याहून शहरात आला होता. गुरुवारी संध्याकाळी तो आणि नितीन जेवणासाठी बाहेर गेले असताना दत्तासोबत त्यांची भेट झाली. हॉटेलबाहेर गप्पा मारत असताना कुरेशी चिकन शॉपमध्ये काम करणाऱ्या मस्तान कुरेशी उर्फ नन्ना (वय 25) चा मित्र समीर शेख याने वाद घालून शिवीगाळ केली. वाद वाढताच मस्तान कुरेशीने हस्तक्षेप करत शिवीगाळ केली. दुकानातून चाकू आणून तिघांवर जोरदार हल्ला चढवला.

प्रथम नितीनच्या डोक्यावर आणि मग छातीत खोल घाव घालण्यात आले. नितीन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तरीही हल्लेखोराने सचिन आणि दत्तावरही वार सुरूच ठेवले. गर्दी जमू लागल्यावर मस्तान कुरेशी आणि समीर पळून गेले.

स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत मागितली, मात्र अनेक वाहनचालकांनी थांबण्यास नकार दिला. परिणामी नितीनला रुग्णालयात दाखल करण्यात उशीर झाला आणि मिनी घाटी रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक भारत पाचोळे, गुन्हे शाखेचे रवी गच्चे व संदीप सोळुंके यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर मस्तान कुरेशी कुटुंबाला भेटून पळण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी मध्यरात्री त्याला अटक केली. मस्तान कुरेशीवर यापूर्वीही मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. समीरचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

समीर हा इलेक्ट्रिशियन असून तो मस्तान कुरेशीचा मित्र आहे. लघुशंकेसाठी गेल्यानंतर त्याचा तिघांपैकी एकाशी वाद झाला होता. नंतर हा वाद उफाळून आला आणि मस्तान कुरेशीने विनाकारण यात उडी घेतली, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

नितीन व सचिन यांच्या वडिलांचे निधन लहानपणीच झाले होते. आईने दोघांना मोठे केले. नितीनची अंडा-चहा गाडी सिडको बसस्थानकाजवळ होती. तो धार्मिक, सामाजिक कार्यात सक्रिय होता. स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांशी त्याचे चांगले संबंध होते. त्याला तीन आणि सचिनला दोन मुले आहेत.

छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरात 229 अतिक्रमणे काढल्यानंतर स्थानिक व्यापारी आक्रमक झाले आहेत. यासाठी केवळ मोदी सरकार जबाबदार आहे. काल जो खून झाला त्याचा आणि आमचा काहीही संबंध नव्हता. तरीसुद्धा आम्हाला शिक्षा का देण्यात आली, असा सवाल व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय