आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी दक्षिण भारतातील नागरिकांनी हिंदी भाषा शिकावी, असे आवाहन करत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवला आहे. हिंदी ही देशाला एकत्र बांधणारी भाषा असून ती शिकल्याने कोणत्याही प्रादेशिक भाषेला धोका नाही, असे मत त्यांनी व्यक्त केल्यानंतर अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
पवन कल्याण हैदराबाद येथे ‘दक्षिण संवाद’ या राजभाषा विभागाच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात बोलत होते. “जर तेलुगू ही माझी माता आहे, तर हिंदी माझी मोठी माता आहे. ही भाषा आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर असून संपूर्ण देशाला जोडणारी आहे,” असे त्यांनी म्हटले. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील वाढती संधी, प्रादेशिक चित्रपटांचे हिंदीतील डबिंग आणि त्यातून होणाऱ्या कमाईकडेही लक्ष वेधले.
मात्र, त्यांच्या या वक्तव्यावरून प्रकाश राज यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पवन कल्याण यांना उद्देशून लिहिले, “फक्त विचारतोय, स्वतःला किती किंमतीत विकले? ही लज्जास्पद गोष्ट आहे.”
प्रकाश राज यांनी यापूर्वीही हिंदी भाषेच्या प्रचाराबाबत पवन कल्याण यांच्यावर टीका केली होती. मे 2025 मध्ये तमिळनाडूतील नेत्यांनी हिंदीला विरोध केला असताना पवन कल्याण यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळीही प्रकाश राज यांनी भाषेच्या सक्तीविरोधात स्पष्ट मत मांडले होते.
दक्षिण भारतातील विविध राज्यांमध्ये हिंदीच्या सक्तीविरोधात एकूणच असंतोष व्यक्त होत असताना पवन कल्याण यांचे वक्तव्य आणि त्यावरून निर्माण झालेला वाद पुन्हा एकदा भाषाविषयक संवेदनशीलतेचा मुद्दा समोर आणतो. हिंदी शिकावी की नाही, हा वैयक्तिक आणि सांस्कृतिक अभिमानाचा विषय असल्याचे मत अनेक प्रादेशिक नेते सातत्याने मांडत आहेत.
हेही वाचा