मुंबई | केदार शिंत्रे : भाजपा नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि इतर दोन आरोपींच्या विरोधात आरोप पत्र दाखल झालं आहे. आरोप पत्रात प्रवीण दरेकर यांच्यासोबतच प्रवीण मर्गज आणि श्रीकांत कदम या दोघांच्या नावाचाही समावेश आहे. मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात बेलार्ड पियर मेट्रोपोलिटन कोर्टात शुक्रवारी आरोप पत्र दाखल झालं आहे. एकूण 904 पानांच्या आरोप पत्रात तिन्ही आरोपींविरोधात आय. पी. सी. कलम 199, 200, 406, 417, 420, 465, 468, 471 आणि 120-ब अंतर्गत आरोप करण्यात आले आहेत.
पोलिसांनी एकूण 29 साक्षीदारांची साक्ष नोंदविली आहे. त्यात 3 पोलीस अधिकारी, एक डेप्युटी कलेक्टर, काही शासकीय अधिकारी तर काही मुंबई बँकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी एम. आर. ए. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र या प्रकरणात मुंबई हायकोर्टा तर्फे दरेकर यांना अटकपूर्व जमीन देण्यात आला आहे.