संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चेचा दुसरा दिवस होता. काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारताच्या सीमा आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना नमन करून केली. त्या म्हणाल्या की, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आपल्या जवानांचे योगदान अतुलनीय आहे.”
यावेळी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी लोकसभेत जोरदार भाषण करत केंद्र सरकारला सुरक्षा अपयशावरून धारेवर धरलं. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर सरकार गप्प का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट टीका केली.
प्रियांका गांधी वाड्रा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारताच्या सीमा आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना नमन करून केली. त्या म्हणाल्या की, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आपल्या जवानांचे योगदान अतुलनीय आहे.”
"काश्मीरसारख्या उच्च लष्करी बंदोबस्त असलेल्या भागात हल्लेखोर एवढा मोठा हल्ला कसा करू शकतात?, हजारो पर्यटक बैसारन व्हॅलीत असताना तिथे एकही जवान का नव्हता? देशातील कोणत्याही गुप्तचर यंत्रणेला हल्ल्याची माहिती मिळाली नाही का?", अशा प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी सुरक्षा व्यवस्थेवर थेट शंका व्यक्त केली.
तसेच, त्यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत विचारलं, "गुप्तचर विभाग प्रमुखांनी किंवा गृहमंत्र्यांनी यानंतर राजीनामा दिला का?, कोणीतरी जबाबदारी घेतली का?", प्रियांका गांधी वाड्रा पुढे म्हणाल्या की, “गृहमंत्री आज संसदेत पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर भाष्य करत होते. ते माझ्या आईच्या अश्रूंवरही बोलले, पण पहलगामच्या हल्ल्यावर मात्र एक शब्दही काढला नाही.” त्यांनी मणिपूरमधील हिंसाचाराचाही उल्लेख करत म्हटलं, "मणिपूर हे संपूर्ण राज्य पेटून निघालं आणि हे सगळं सत्ताधाऱ्यांच्या काळात घडलं आहे. तरीही कोणीही जबाबदारी घेत नाही."
भाषणाच्या अखेरीस त्या म्हणाल्या,
“26/11 च्या हल्ल्यानंतर आम्ही काय केलं, हे विचारता?, आम्ही त्या सर्व दहशतवाद्यांना त्याच ठिकाणी ठार केलं. आज मात्र हल्ले होतात आणि सरकार जबाबदारीपासून दूर राहातं.”
भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
संसदेत पहलगाम हल्ल्यावर सरकार गप्प का?
“गृहमंत्र्यांनी जबाबदारी घेतली का?”
काश्मीरमधील सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांवर प्रश्नचिन्ह
मणिपूर हिंसाचारावरून सरकारवर गंभीर टीका
“26/11 च्या वेळी आम्ही कृती केली, आज फक्त चर्चा”
प्रियांका गांधी वाड्रा यांचे हे भाषण केवळ राजकीय टीका नसून, देशाच्या सुरक्षेविषयी सरकारकडून पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी करणारा स्पष्ट संदेश होता. पहलगाम हल्ल्यासारख्या घटनांवर संसदेत चर्चा झालीच पाहिजे, आणि त्या संदर्भात सरकारने उत्तर देणे ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. हेच त्या आपल्या भाषणातून अधोरेखित करत होत्या.
संसदेतील ही चर्चा आता पुढे कोणत्या दिशेने जाते, गृहमंत्रालय आणि पंतप्रधान यावर काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचा