ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने हजारो शिवभक्तांनी मोठ्या भक्तिभावाने उपस्थिती लावली. या पार्श्वभूमीवर शिवभक्त नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणात इतिहास, श्रद्धा, राजकारण आणि सामाजिक बांधिलकी या सर्व क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश करत एक हृदयस्पर्शी आणि ठाम निवेदन केले. गोगावले यांनी भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्यासह हिंदुत्वाचा जागवणारे बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, आणि शौर्याचे प्रतीक भारतीय सैन्य यांना मानाचा मुजरा करत केली. त्यांनी सांगितले की, “राज्याभिषेक सोहळा हे केवळ एक कार्यक्रम नाही तर हे शिवप्रेमाचं सजीव दर्शन आहे.”
गोगावले यांनी उपस्थित शिवभक्तांचे आभार मानताना नमूद केलं की, "दोन दिवस वारा, पाऊस, ऊन कशाचीही तमा न बाळगता हजारो शिवभक्त स्वतःच्या खर्चाने इथे आले आहेत. कुठल्याही संस्थेची मदत नाही, हे आहे मराठ्यांचं निस्सीम शिवप्रेम." त्यांनी श्रद्धास्थळांच्या वारीचा उल्लेख करत सांगितले की, “पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी, तिरुपती सगळीकडे जा, पण एकदा तरी रायगडावर या, हाच माझा आग्रह आहे.” “राजांनी फक्त ५० वर्षे आयुष्य जगलं, त्यातील ३६ वर्षे देश, धर्म आणि जनतेसाठी दिली. त्यांच्या नावाशिवाय कोणतीही गोष्ट अपूर्ण आहे,” असं म्हणत त्यांनी एक कवीताही सादर केली.
राजकीय आणि सामाजिक बाबींवर ठाम भूमिका भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेऊन त्यांना “शिवराज्याभिषेकाचा एक दिवस आयुष्यात राखावा” अशी कळकळीची विनंती केली. त्याच्या तत्काळ प्रतिसादाचं स्वागत केलं. यासोबतच त्यांनी शिवसृष्टी प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या निधीबाबत माहिती देत “५० कोटी मंजूर झालेत, पण अजून थोडे लागतील, कारण ही सृष्टी पाहिल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकणार नाही,” असं आवर्जून सांगितलं. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कामगिरीचं कौतुक करत सांगितलं की, “जे अफजलखानाच्या जागेवर बांधले गेलेलं अनावश्यक भव्य बांधकाम इतर कोणालाही हटवता आलं नाही, ते मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदेंनी एका फटक्यात हटवलं आणि आता तिथं फक्त शिवाजी महाराज आहेत.”
रायगडावर अनेक पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या धनगर समाजाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी स्पष्ट सांगितलं, “तोपर्यंत आमचं सरकार आहे, तोपर्यंत या समाजाला खाली उतरवलं जाणार नाही. उलट त्यांच्यासाठी कायमस्वरूपी घरे बांधण्याची योजना आखली जाईल. त्यांनी गड राखला, गड टिकवला – हे आम्ही विसरू शकत नाही.” कार्यक्रमाची शिस्त, शांती आणि सांस्कृतिक उंची याची प्रशंसा करत गोगावले म्हणाले, “तरुणांनी स्वतःच्या खर्चाने कार्यक्रमाचं आयोजन केलं, अनुचित प्रकार टाळले, आणि पुढची पिढी तयार करत आहेत. हीच खरी शिवसंस्कृती आहे.”
महाभोजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगून, त्यांनी शासनाने दिलेल्या ५ कोटींच्या निधीबद्दल आभार मानले. त्यांनी सांगितलं की, “आम्ही दोन्ही कार्यक्रमासाठी हा निधी वापरतो आहोत, आणि उर्वरित खर्चही नियोजनबद्ध करणार आहोत.” गोगावले यांनी भाषणाचा समारोप अत्यंत भावनिक शैलीत करत सांगितलं, “शिवाजी महाराजांचा जन्मच झाला नसता, तर आपली अवस्था काय झाली असती, हे आपण विचार केलं पाहिजे. त्यामुळे कोण कितीही मोठं व्हा, पण शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका.”
हेही वाचा..