राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत असलेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा संभाव्य पुनर्मिलाप, यावर आता शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "माझ्या मते दोन्ही बंधू पुन्हा एकत्र येतील, असं अजिबात वाटत नाही," अशी ठाम प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आम्हाला काही अडचण नाही, पण...
मंत्री शिरसाट म्हणाले की, "जर दोन्ही बंधू एकत्र आले तर आमचं काही अडत नाही. मात्र, यामागे लोकांचा आग्रह आणि गोंधळ निर्माण करणारे संकेत आहेत. सध्यातरी हे फक्त अफवांचे पीक आहे. या गोष्टींवर भाष्य करण्याची ही योग्य वेळ नाही."
"उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संबंधांचा इतिहास जुना आहे. राज ठाकरे काय बोलतात यावर लगेच निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. ते काय बोलतात, का बोलतात हे त्यांनाच माहिती. मात्र, या अफवांमागे कोणाचा तरी अजेंडा आहे. उद्धव साहेबांना मी गेली 40 वर्षं ओळखतो आणि राजसाहेब तर त्यांचे बंधू आहेत. त्यांना काय करायचं आहे याची कल्पना दोघांनाही आहे," असंही शिरसाट यांनी नमूद केलं.
युती होणार नाही, हेच सत्य
संजय शिरसाट यांनी स्पष्ट सांगितलं की, "ही युती होणार नाही, हेच तेवढं सत्य आहे. काही लोक या कल्पनेला फुंकर घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा विषय केवळ दबावाने पुढे नेला जात आहे. प्रत्यक्षात तसं काही घडणार नाही."
राजकीय चर्चांना ऊत
उद्धव ठाकरे यांच्या अलीकडील वक्तव्यांतून पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्याबाबत सौम्य संकेत मिळत असल्याचं काहींना वाटतंय. मात्र, मंत्री शिरसाट यांनी हे सगळं फेटाळत, अजूनही दोघांमध्ये तणाव कायम असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे 'मनसे-शिवसेना" (UBT) पुन्हा एकत्र येणार का ?, यावर आता संभ्रम अधिकच वाढला आहे.
हेही वाचा