मुंबईत 5 जुलै रोजी होणाऱ्या मराठी भाषा समर्थक मोर्चाला आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे या दोन्ही पक्षांनी शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीविरोधात एकत्र येत मोर्चाचे आयोजन केले आहे.
राज्य सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत त्रिभाषा सूत्र लागू करत पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या निर्णयाविरोधात राज्यभर मराठीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे 5 जुलैला एकत्र येत मुंबईत मोर्चा काढणार आहेत. राज ठाकरे यांनी सर्व पक्षांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते.
या मोर्चाला शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही सक्रिय पाठिंबा दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे या निर्णयाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मातृभाषेतील शिक्षणाचा आग्रह योग्य असून पहिल्यापासून हिंदी सक्ती योग्य नाही. विविध भाषा शिकण्यात हरकत नाही. मात्र मातृभाषेला डावलण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो योग्य नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत जयंत पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा