उत्तराखंडातील श्रद्धेचं प्रमुख केंद्र असलेल्या हरिद्वारच्या मनसा देवी मंदिर परिसरात रविवारी मोठा अपघात घडला. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर अचानक निर्माण झालेल्या चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 50 हून अधिक जण जखमी झाली आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, विजेचा धक्का बसल्याची अफवा पसरल्यानंतर गर्दीत गोंधळ उडाला आणि लोकांनी एकमेकांना धडक देत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. यामुळेच चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गढ़वाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. दुर्घटनेनंतर जखमी भाविकांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. काहींवर प्राथमिक उपचार मंदिर परिसरातच करण्यात आले. एकूण 55 जण जखमी झाले असून, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
स्थानिक पोलीस आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक (SDRF) घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, प्रशासनाशी संपर्क ठेवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जात असल्याचे सांगितले आहे.
हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रमेन्द्र सिंग डोबाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "घटनेनंतर तातडीने रुग्णवाहिका आणि बचाव पथकांना पाठवण्यात आले. सुमारे 35 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, आतापर्यंत 6 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे."
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी असते. विशेषतः कांवड यात्रा करणारे हजारो शिवभक्त या काळात हरिद्वारमध्ये दाखल होतात. त्यामुळे गर्दीचा भार अधिक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
जखमी झालेल्या एका भाविकाने सांगितले की, "मंदिरात अचानक गर्दी वाढली आणि पुढे काही तरी गोंधळ झाला. लोकांनी मागच्या बाजूकडे धाव घेतली आणि त्यामुळे काहीजण खाली पडले. माझ्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. "हरिद्वारमध्ये घडलेली ही घटना अत्यंत दु:खद आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो," असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले की, प्रशासन यामध्ये संपूर्ण लक्ष देत असून, जखमींना त्वरित वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे. "माता मनसादेवीच्या कृपेने सर्वांची सुरक्षितता राखली जावी," अशी प्रार्थना त्यांनी केली.
हेही वाचा