थोडक्यात
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला आश्वासन दिलं
ओबिसीच्या हक्कांवर कोणताही गदा येणार नाही.- फडणवीस
भिवंडी येथे आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 234 व्या शासकीय जयंती सोहळ्यात फडणवीस बोलत होते.
CM Devendra Fadnavis On Maratha Reservation : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला आश्वासन दिलं की, मराठा आरक्षण प्रक्रियेमुळे त्यांच्या हक्कांवर कोणताही गदा येणार नाही. मराठा समाजातील फक्त त्याच व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळेल, ज्यांची कुणबी नोंद दस्तऐवजांमध्ये आढळून आली आहे. त्यामुळे ओबीसींच्या वाट्याला आलेल्या जागा वा संधी कमी होणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 234 व्या शासकीय जयंती सोहळ्यात फडणवीस बोलत होते. त्यांनी सांगितलं की, ओबीसी समाजाच्या प्रगतीशिवाय खरी सामाजिक समता साध्य होणार नाही. यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जात असून, भविष्यातही मागण्या आल्यास त्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील.
फडणवीस म्हणाले की, सरकारची नीती स्पष्ट आहे “एका समाजाचा हिस्सा काढून दुसऱ्याला द्यायचा नाही.” निजामशाहीच्या काळातील हैदराबाद गॅझेट रेकॉर्डच्या आधारे पात्र ठरणाऱ्यांनाच प्रमाणपत्र दिलं जाईल, असा त्यांनी पुनरुच्चार केला. यामुळे ओबीसींचे हक्क अबाधित राहतील आणि समाजात संभ्रम निर्माण होऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
ते पुढे म्हणाले की, ओबीसींना मुख्य प्रवाहात आणणं हे सरकारचं प्राधान्य आहे. समाजाने मागण्या केल्या तर त्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. "तुम्ही मागत राहा, आम्ही शक्य तेवढं देत जाऊ," असं फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनामुळे ओबीसी समाजात दिलासा निर्माण झाला आहे.