उत्तर प्रदेशातील सर्व सरकारी आणि मान्यताप्राप्त खासगी शाळांमधील उन्हाळी सुट्टी आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे, असे उत्तर प्रदेश मूलभूत शिक्षण मंडळाने म्हटले आहे. बोर्डाने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, कडक उन्हामुळे जून अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांसाठी शाळेत जाण्याची आवश्यकता नाही. 1 जुलै 2025पासून नियमित वर्ग पुन्हा सुरू होतील. यापूर्वी, बोर्डाच्या 26 डिसेंबर 2024 च्या पूर्वीच्या आदेशानुसार, उन्हाळी सुट्टी 20 मे ते 15 जूनपर्यंत नियोजित होती.
"सध्याच्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे 30 जून 2025 पर्यंत विद्यार्थी शैक्षणिक उपक्रमांसाठी शाळेत जाऊ शकणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जुलै 2025 पासून विद्यार्थ्यांसाठी नियमित शैक्षणिक सत्रे पुन्हा सुरू होतील," असे परिपत्रकात म्हटले आहे. अधिकृत परिपत्रकानुसार, विद्यार्थी सुट्टीवर असतील. परंतु शिक्षक, शिक्षा मित्र, प्रशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शाळा 16 जून रोजी पुन्हा सुरू होतील. त्यांनी मूळ वेळापत्रकानुसार उपस्थित राहून शैक्षणिक, प्रशासकीय आणि इतर अधिकृत कर्तव्ये पार पाडणे अपेक्षित आहे. मान्यताप्राप्त खासगी शाळांच्या व्यवस्थापन समित्यांना सध्याच्या हवामान परिस्थितीनुसार आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांना या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा