उच्च न्यायलायाच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिका अधिक सक्रिय झाली असून गेल्या 5 दिवसात अनधिकृत बांधकामांवर हल्लाबोल करताना दिसत आहे. अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरु करण्यात आली असून स्थानिकांचा मोठा विरोध होताना दिसत आहे. मात्र स्थानिकांचा विरोध झुगारून गेल्या पाच दिवसात 73 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.
ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम असूनही त्यावर योग्य कारवाई केली जात नाही, असे उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेवर कडक ताशेरे ओढले. त्यानंतर ठाणे आयुक्त सौरभ रावयांनी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभागांनुसार विशेष पथकाची स्थापना केली. विशेष पथकांच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. ही कारवाई यापुढेही सुरूच राहील अशी माहिती उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे यांनी यावेळी दिली. काही ठिकाणी नागरीवस्ती असल्यामुळे स्थानिकांचा मोठा अडथळा निर्माण झाला होता मात्र पोलीस बंदोबस्तामध्ये हे बांधकाम पाडण्याचे सत्र सुरु होते. यावेळी उपायुक्त मनीष जोशी, सचिन सांगळे यांच्यासह पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बोरसे याठिकाणी उपस्थित होते.
नौपाड्यातील कोपरी विभागात 6, वागळे परिसरात 4, लोकमान्य सावरकर नगरमध्ये 6,वर्तकनगरमध्ये 5, माजिवडा मानपाडा विभागात 13, उथळसर मध्ये 3 आणि कळवा परिसरात 6, मुंब्रा परिसरात 7 आणि दिवा परिसरात तब्बल 23 अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली आहेत. यापुढेही अनधिकृत बांधकामांवर कारवाई चालूच राहणार असल्यामुळे भूमाफियांना याचा मोठा फटका बसणार आहे.