संपुर्ण राज्यभरात गणपती बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप दिला जात आहे. मुंबईसह पुणे आणि नाशिकच्या देखील मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. गेली दहा दिवस गणेशभक्तांनी मनोभावे पूजलेल्या लाडक्या गणरायाला आज निरोप दिला जात आहे.
अशातच भारतातील सर्वात उंच गणेशमूर्तीचं विसर्जन दुपारी 1 च्या दरम्यान पार पडल आहे. हैदराबादमधील 69 फूट उंच असलेल्या खैरताबाद गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक दुपारी 1:04 वाजता निघाली. खैरताबादमध्ये सकाळी 7:44 वाजता स्थापना स्थळापासून मिरवणूक पुढे सरकत असतानाच वायरिंगमध्ये थोडासा गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी मिरवणुकीदरम्यान येणारे अडथळे दूर करण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था राबवली होती.
या विसर्जन मिरवणुकीला सुमारे पाच तास लागले असून नेकलेस रोडजवळील मिरवणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जिथे मूर्ती विसर्जित करण्यासाठी एक खास क्रेन तयार करण्यात आली होती. दुपारी 1:21 वाजता हुसेन सागर तलावाच्या तपकिरी पाण्यात या 69 फूट उंच मूर्तीचे भक्तीभावात आणि मोठ्या दिमाखात विसर्जन पार पडले आहे.