आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील युतीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. याच अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत युतीबाबत थेट विचारणा केली असल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना विचारले की, मनसेसोबत युती केल्यास पक्षाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल का?, यावर बहुसंख्य नगरसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "जर युती करण्याचा निर्णय घेतला, तर तो सर्वांना विश्वासात घेऊनच होईल."
या बैठकीत उपस्थित असलेले उद्धव सेनेचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ज्या पद्धतीने विरोधक महायुती करून लढत आहेत, तसंच आपणही विचार करायला हवा. उद्धवसाहेबांनी आम्हा सर्व माजी नगरसेवकांना याबाबत मत विचारले आणि आम्ही सर्वांनी त्याला होकार दिला. साहेब ज्यांच्यासोबत युती करतील, त्याबाबत आम्ही पूर्ण अंमलबजावणी करू.”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेमधील संभाव्य युतीवरून आगामी राजकीय समीकरणे कशी बदलतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दोन्ही पक्षांची विचारसरणी आणि बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय वारसा हक्काची छाया या युतीस नव्या शक्यता निर्माण करून देऊ शकते.
हेही वाचा