मुंबईमधील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळीचा पूल 8 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर मुंबईकरांसाठी खुला केला जाणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर आज, 14 जून रोजी संध्याकाळी 4 वाजल्यापासून कोणताही मोठा समारंभ न करता या पुलाचे उद्घाटन केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात महानगरपालिकेला आदेश दिले असून आज संध्याकाळपासून विक्रोळीचा ब्रीज हा नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे.
विक्रोळी पुलाचे वैशिष्ट्ये
हा पूल मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा अत्यंत महत्वाचा पूल मानला जातो. विक्रोळी उपनगरांमधील पश्चिमकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि आणि पूर्वेकडील पूर्व द्रुतगती महामार्ग या पुलाला जोडले गेले आहेत. यामुळे पूर्व द्रुतगती मार्गाकडून पवईकडे जाणाऱ्या नागरिकांच्या इंधनामध्ये आणि वेळेमध्ये ही बचत होणार आहे. तसेच घाटकोपर विक्रोळी आणि कांजूरमार्ग रेल्वे स्थानकापासून 5 किमीपर्यंतच्या परिसरामधील वाहनधारकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या वेळेत चक्क अर्ध्या तासाची बचत होणार आहे.
या पुलाच्या बांधणीचा खर्च सुमारे 180 कोटी इतका आला आहे. विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ या पुलाची उभारणी केली असून पुलाची एकूण रुंदी 12 मीटर तर लांबी 615 मीटर इतकी आहे. रेल्वे विभागाकडून एकूण या पुलासाठी 7 गर्डर्स उभारले गेले आहेत. त्यांचे एकूण वजन 655 टन इतके आहे. जवळजवळ 7 ते 8 वर्ष प्रतीक्षेत असलेल्या या पुलाची बांधणी पूर्ण झाली असून आज हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
रेल्वे फाटक ओलांडताना कोणत्याही प्रकारचे अपघात होऊ नये, यासाठी मुंबई महापालिका आणि रेल्वेच्या वतीने या पुलाची उभारणी केली आहे. एकूण 615 मीटर लांब असलेल्या या पुलाचे 565 मीटर पर्यंतचे काम महापालिकेने केले असून उर्वरित 50 मीटर पर्यंतची बांधणी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचे अँपरोच रस्ते मार्गिकांवरील कॉंक्रिट, ध्वनी रोधक, अपघातरोधक अडथळा (Anti Crash Barriers), रंगकाम आणि मार्ग रेषा आखणी या सर्व कामांची पूर्तता झाली आहे. सर्व कामे वेळेत पूर्ण केल्यासंदर्भांत मुख्यामंत्र्यांनी महापालिकेचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर या पुलावर रस्ते आणि वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक थांबा क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या मुंबईमधील महत्वाकांक्षी पुलाच्या उद्घाटनामुळे नागरिकांचा अर्धा तास वेळ वाचणार आहे. त्यासोबतच वाहतूक कोंडीलाही आळा बसणार आहे.
हेही वाचा