पश्चिम बंगालचे सरकार हे नेहमी चर्चेत असलेले बघायला मिळते. पश्चिम बंगालच्या राजकारणातील एकेकाळचे लोकप्रिय नेते इंद्रजीत सिन्हा हे बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ स्मशानभूमीच्या इथे भीक मागताना दिसून आले. प. बंगालमध्ये त्यांची 'बुलेट दा' अशी ओळख होती. मात्र त्यांची आजारपणातील अवस्था बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशअध्यक्ष व केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. सुकांत मजूमदार यांनी इंद्रजीत सिन्हा यांना त्यांची अवस्था बघून तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
इंद्रजीत सिन्हा हे एकेकाळी बंगाल भाजपमध्ये आरोग्य सेवा सेलचे अध्यक्ष होते. अडचणीच्या वेळी त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला होता. त्यांची रुग्णालयाशी संबंधित सर्व मदतदेखील केली होती. त्यांच्या उल्लेखनीय कामामुळे बंगालमध्ये त्यांच्या नावाचा जयजयकार होत होता. त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. मात्र गेले दोन वर्ष इंद्रजीत सिन्हा कर्करोगाशी झुंज देत आहेत.
सर्वात आधी इंद्रजीत यांना ट्युमर असण्याचे निदान झाले होते. मात्र नंतर त्यांना कर्करोग असल्याचे निदान झाले. उपचारासाठी त्यांना एकही रुग्णालय उपलब्ध झाले नाही. उपचाराबरोबरच त्यांच्या खाण्याची व राहण्याचीदेखील गैरसोय झाली. कोणताच पर्याय नसल्याने त्यांनी स्मशानभूमी बाहेर भीक मागण्यास सुरुवात केली. एकेकाळी राजकारणात स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या व्यक्तीला मात्र झाडाखाली रात्र काढावी लागली. इंद्रजित हे 40 वर्षाचे असून अविवाहित आहेत. त्यांच्या कुटुंबात सध्या कोणीही नाही. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे.
इंद्रजीत यांनी 10 वर्षांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजप हा मुख्य विरोधी पक्ष आहे. मात्र सध्या आजारपणामुळे ते काम करण्यास सक्षम नाहीत. काळजी घेण्यासाठी कुटुंबातील कोणीही नसल्याने आणि उपचारासाठी पैसे तसेच साधन नसल्याने त्यांनी भीक मागण्याचा निर्णय घेतला. त्यांचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेलीही दिसून येत आहे.