भारतात दिवाळी हा सण सर्वत्र साजरा केला जातो. दिवाळी हा सण छोट्यांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला नवीन सकारात्मक उर्जा देत असतो. दिवाळी सणाला धनत्रयोदशीपासून सुरुवात होते. तसेच त्यानंतर नरक चतुदर्शी, लक्ष्मी पूजन, भाऊबीज आणि दीपावली पाडवा साजरा केला जातो. चैत्यनाचा, आनंदाचा, उत्साहाचा सण म्हणून दिवाळी या सणाकडे पाहिले जाते. दिवाळी सणाला मुख्य म्हणजे केला जाणारा फराळ (Diwali Faral). या सणाला केले जाणारे वेगवेगळे पदार्थ खाण्याची मजा काही वेगळीच असते. पण तुम्हा सर्वांना माहित आहे का फराळ कधी सुरु झाला आणि का केला जातो. तर चला जाणून घेऊया याविषयी.
दिवाळी या सणाला तर विविध पदार्थांची मेजवानी असते. पूर्वीच्या काळी आपल्या आहारात गोड पदार्थ क्वचितच मिळायचे. पण आता दिवाळी सणामध्ये लाडूंचे, करंजी, अनारस असे अनेक पदार्थांनी आपले तोंड ‘गोड’ होऊन जाते. दिवाळी हा सण पावसाळा संपला की शेतीमधील नवीन पिके घेतल्यानंतर शरद ऋतूत आणि आश्विन आणि कार्तिक या मराठी महिन्यामध्ये साजरा केला जातो. दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, गायी म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या अशा प्रकारच्या ओव्याही गायल्या जातात.
गोडधोड पदार्थ शेतकऱ्याच्या घरात कधीतरी केले जात. या काळात गोडधोड म्हणून आणि एक आनंद म्हणून शेतकरी आपल्या घरी हे पदार्थ करत असत. यालाच अनुसरुन आपली फराळ संस्कृती वृद्धींगत होत गेले आहे. दिवसागणिक तिचे स्वरुपही बदलत आहे.
दिवाळी या सणामागे हजारो वर्षांचा इतिहास आहे. दिवाळी हा सण कसा सुरु झाला आणि का सुरू झाला यामागे अनेक वेगवेगळी कारणे पाहायला मिळतात. दिवाळीत केली जाणारी सर्वात महत्त्वाची केली जाणारी गोष्ट म्हणजे ‘फराळ’. दिवाळीत केला जाणारा फराळ हा सर्वांनाच आवडतो आणि त्यांची चवीही काही वेगवेगळीच असते. दिवाळी म्हटलं की फराळ आठवतो आणि फराळ म्हटलं की डोळ्यासमोर येते ते म्हणजे करंज्या, चकल्या, लाडू, चिवडा, शेव हे पदार्थ. तसेच आपण घरी आलेल्या पाहुण्यांना आणि आपल्या शेजाऱ्यांना आपण फराळ देऊन त्यांच्याबरोबर आनंद साजरा करत असतो. ही गोष्ट मानवी नातं दृढ करायला नकळतपणे मदत करत असते.