इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पहिला सामना 24 जून रोजी इंग्लंडने 5 विकेट्सने जिंकला होता आणि त्यामुळे त्यांनी 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये सुरू होणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठीची अंतिम अकरा खेळाडूंची यादी जाहीर केली असून, पहिल्या सामन्यात खेळलेल्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मात्र सामन्याआधी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर संघाबाहेर गेला आहे. कौटुंबिक कारणांमुळे त्याला दुसऱ्या कसोटीपासून माघार घ्यावी लागली असून, त्यामुळे तो अंतिम संघात सामील झालेला नाही. इंग्लंडने 26 जून रोजी जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघात जोफ्राचा समावेश होता, आणि त्याच्या पुनरागमनाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. जोफ्राने अखेरचा कसोटी सामना भारताविरुद्धच खेळला होता आणि सुमारे चार वर्षांनंतर त्याचे कसोटीत पुनरागमन होणार असे अपेक्षित होते. मात्र, शेवटच्या क्षणी त्याला बाजूला राहावे लागले.
आत्तापर्यंत जोफ्रा आर्चरने इंग्लंडकडून 13 कसोटी सामने खेळले असून, त्यात त्याने 42 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने तीन वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. आता त्याच्या पुनरागमनासाठी चाहत्यांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसऱ्या कसोटीत इंग्लंड संघात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, कर्णधार बेन स्टोक्स यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या सामन्यातील यशस्वी अकरा खेळाडूंनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.