Russia-China: पुतिन भारतात असतानाच रशिया–चीनचा संयुक्त युद्धसराव; भारताची चिंता वाढली
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन नुकतेच भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. या भेटीत भारत–रशिया दरम्यान अनेक महत्त्वाचे करार झाले. पुतिन यांनी भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा कमी पडू देणार नसल्याचं स्पष्ट आश्वासनही दिलं. पण या भेटीनंतर लगेचच एक मोठी घटना समोर आली असून भारताची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
पुतिन भारताच्या दौऱ्यावर असतानाच रशियानं चीनसोबत तिसरा संयुक्त क्षेपणास्त्रविरोधी युद्धसराव केला आहे. हा सराव जपानच्या समुद्रात घेण्यात आला. यात दोन्ही देशांच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांनी शत्रूंचे मिसाईल पाडण्याचा आणि शत्रूंच्या मिसाईल तळांना नष्ट करण्याचा सराव केला.
ही घटना महत्त्वाची त्यामुळे मानली जात आहे की, भारताचा मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या चीनसोबत रशियाने असा सैनिकी सराव केला आहे. पुतिन भारत दौऱ्यावर असताना हा सराव झाल्यामुळे याकडे रशियाची संतुलित परराष्ट्र नीती म्हणून पाहिले जात आहे.
चीनच्या संरक्षण मंत्रालयाने या सरावावर प्रतिक्रिया देत सांगितले की, हा सराव कोणत्याही तिसऱ्या देशाला लक्ष्य करून केलेला नाही. जगातील बदलत्या सुरक्षेच्या परिस्थितीमुळे हा सराव झाल्याचं चीनचं म्हणणं आहे.
रशियाकडूनही स्पष्ट करण्यात आलं आहे की या सरावाचा भारत–रशिया संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. तरीही दीर्घकालीन सुरक्षेच्या दृष्टीकोनातून, चीन–रशिया संरक्षण सहकार्य भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. या सगळ्या घडामोडीमुळे भारताला दोन्ही महत्त्वाच्या देशांबरोबरचे संबंध जपताना अधिक सावध पाऊले उचलावी लागणार आहेत.
• पुतिन भारतात असतानाच रशिया–चीनचा तिसरा संयुक्त क्षेपणास्त्रविरोधी सराव.
• सरावात युद्धनौका, पाणबुड्या आणि मिसाईल तळांवरील हल्ल्यांची प्रात्यक्षिके.
• भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चीन–रशिया सहकार्य चिंतेचे.
• रशिया आणि चीन दोघांनीही याचा भारताशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
