होऊ परंपरेचे दास, साने गुरुजी ते भिडे गुरुजी महाराष्ट्राचा प्रवास; सुप्रिया सुळेंची टीका
मुंबई : टिकलीसंदर्भात केलेल्या विधानामुळे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महिला पत्रकाराने टिकली न लावल्याने त्यांनी बोलण्यास नकार दिला होता. यावरुन आता मोठा वाद निर्माण झाला असून सर्वच स्तरांतून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भिडे गुरुजींवर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन हेरंब कुलकर्णी यांची कविता शेअर करत संभाजी भिडे यांच्या या विधानावर निशाणा साधला आहे. तर, जयंत पाटील यांनीही भिडे गुरुजींवर टीकास्त्र सोडले आहे. हे अनाकलनीय आहे. महाराष्ट्रातील सगळ्या महिला त्यांचा निषेध करतील. मी त्यांचे कधी ही समर्थन केलेले नाही. सत्तारूढ पक्ष ही प्रवृत्ती जपते आहे, अशी टीका पाटलांनी केली.
काय आहे सुप्रिया सुळेंची फेसबुक पोस्ट?
तू आणि मी ....
मी लावतो टिळा
तू लाव टिकली
परंपरेच्या बाजारात
अक्कल आम्ही विकली
मी लावतो भस्म
तू लाव कुंकू
गुलामीचा शंख
दोघे मिळून फुंकू
तू घाल मंगळसूत्र
मी घालतो माळ
मनूने मारलेली रेषा
मनोभावे पाळ
तू घाल बांगड्या
माझ्या हातात गंडा
मुकाट्याने ऐक नाहीतर
आमच्या हातात दंडा
मी घालतो मोजडी
तू जोडवे घाल
सप्तपदी च्या मर्यादेत
जन्मभर चाल
तू घाल अंबाडा
मी शेंडी राखतो
विज्ञानाच्या प्रगतीला
परंपरेने झाकतो
मी घालतो टोपी
तू घाल बुरखा
बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे
एकमत आहे बर का...!!!
मी धोतरात, तू शालूत
होऊ परंपरेचे दास
साने गुरुजी ते भिडे गुरुजी
महाराष्ट्राचा प्रवास .....!!!!!
हेरंब कुलकर्णी
काय आहे प्रकरण?
संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. यामध्ये महिला पत्रकारांचाही समावेश होता. या भेटीबद्दल महिला पत्रकाराने विचारले असता, संभाजी भिडे यांनी या महिला पत्रकाराकडे पाहिले आणि तुझ्या कपाळाला टिकली नाही म्हणून प्रतिक्रिया देणार नाही, असे सांगितले. एवढेच नाही तर आपली भारतमाता विधवा नाही. प्रत्येक स्त्री ही भारतमातेसमान असते, तू कुंकू लाव. मग मी तुझ्याशी बोलेन, असे विधान देखील त्यांनी केले. या वक्तव्यानंतर आता संभाजी भिडेंना महिला आयोगाची नोटीस बजावण्यात आली आहे.