एकनाथांच्या राज्यात माझा शेतकरी अनाथ; राजू शेट्टींची बोचरी टीका
कोल्हापूर : राज्यात अवकाळी पावसाने, गारपीटने, हवामान बदलांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन टीकास्त्र सोडले आहे. एकनाथांच्या राज्यात माझा शेतकरी अनाथ झाला, अशा शब्दात राजू शेट्टींनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
काय म्हणाले राजू शेट्टी?
अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांनी प्रभूराम चंद्राचे दर्शन घेत आहेत ते त्यांनी खुशाल घ्यावे. मात्र, राज्याच्या प्रमुखाला व्यक्तिगत निर्णयापेक्षा सर्वांसाठीचे कर्तव्य श्रेष्ठ असतात. यामुळे एकनाथांच्या राज्यात माझा शेतकरी अनाथ झाला, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. तर, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशी विनंती देखील त्यांनी एकनाथ शिंदेंना केली आहे.
दरम्यान, अयोध्या वारीनंतर एकनाथ शिंदे आज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. नाशिक येथील नीताने, ढोलबारेमधील अवकाळी नुकसानीची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावेळी सरसकट पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी तात्काळ कृषी आयुक्तांना दिले आहेत.