उद्धव ठाकरे आपले आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा खोचक टोला
सूरज दहाट | अमरावती : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीबाबत सध्या राज्यात चर्चा सुरु आहे. परंतु, वंचित शिवसेनासोबत युती करणार की महाविकास आघाडीसोबत याबाबत संभ्रम होता. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचे आमदार सांभाळू शकले नाहीत, ते घटक पक्ष कसे सांभाळतील, असा टोला त्यांनी लगावला आहे.
वंचित आणि शिवसेनेची युती होत असेल तर त्यात आम्हाला काहीही आक्षेप नाही. त्यांचा तो अधिकार आहे. मात्र, उद्धवजींना स्वतःच्या पक्षाचे आमदार टिकवता आले नाही. मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये घटक पक्ष कसे सांभाळावे हे जे गुण आहेत. ते गुण उद्धव ठाकरे यांच्यात नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर कोणत्या गुणावर जात आहे हे मला माहित नाही. आपल्याच पक्षातील आमदारांना उद्धव ठाकरे सांभाळू शकत नाही. तर घटक पक्षाला काय सांभाळतील, अशी खोचक टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
जनतेच्या मनात असेल तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधान होऊ शकतात, असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत भाष्य केले आहे. संजय राऊत व राहुल गांधी यांनी 2047 ची वाट पंतप्रधान पदासाठी पहावी. राहुल गांधी व संजय राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणे बंद करावे. पंतप्रधान पदाच स्वप्न त्यांचं खरं होणार नाही. 150 देशांनी मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे. जनतेच समर्थन पंतप्रधान मोदींना आहे, असा निशाणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत व राहुल गांधीना लगावला आहे.